नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात हनुमानचालिसावरून राजकारण तापले असताना याप्रकरणी तुरुंगात पोलिस अधिकार्यांकडून जातीयवाद होत असल्याचे पत्र खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठविले आहे. यानंतर याप्रकरणी महाराष्ट्र सरकारने 24 तासांत उत्तर देण्याचे आदेश बिर्ला यांनी दिले आहेत.
मी खालच्या जातीची असल्याने तुरुंगात मला पाणी प्यायला दिले जात नाही. मला अश्लील भाषेतही शिवीगाळ केली जात आहे. मी अनुसूचित जातीचे असल्याने मला बाथरूमही वापरण्यास दिले जात नसल्याचा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी पत्रात केला आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर चालिसा अट्टाहास अंगलट आलेल्या राणा दाम्पत्याची मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी चांगलीच कानउघडणी केली आहे. गुन्हा रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावत तगडा हादरा दिला आहे. विशेष सरकारी वकिलांच्या दाव्यात तथ्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
मुंबई पोलीसांनी राणा दाम्पत्यावर 124 अ आणि 353 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची चांगलीच हजेरी घेत फटकारले.
याचिकाकर्ते कायद्याचा सन्मान करणारे लोकप्रतिनिधी आहेत, तर त्यांनी पोलीसांना विरोध करण्याचे कारण नव्हते, अशा शब्दात राणा दाम्पत्याला न्यायालयाने फटकारले.