मुंबई; पुढारी ऑनलाईन : राज्यातील प्रगती पाहून विरोधकांना जळजळत आहे, मळमळत आहे. त्यामुळे ते राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करित आहेत. टीकेचे भोंगे वाजवणाऱ्यांना मी काडीचीही किंमत देत नाही, अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
बेस्टच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, आजचा कार्यक्रम राजकीय नाही त्यामुळे मी येथे राजकीय काही बोलणार नाही, पण राज्यात जे काही चालले आहे त्याला उत्तर देण्यासाठी लवकरच सभा घेऊ असे ते यावेळी म्हणाले.
बेस्ट तर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बेस्टच्या कार्याचा गौरव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. एसटी प्रमाणे बेस्ट देखिल आर्थिक संकटातून जात आहे. पण, त्याची तमा न बाळगता ते मुंबईकरांसाठी अविरत सेवा देत आहेत. बेस्ट फक्त देशात नाहीतर जगात नंबर एक आहे. तसेच तीने तो दर्जा टिकवून ठेवला आहे.
चला पुढे चला
बेस्टतर्फे सध्या 'चला पुढे चला' ही मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेचा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले, बेस्टच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि विशेषत: कंडेक्टरांचे कौतुक करायला पाहिजे. सर्व अडअडचणींचा सामना करत रोज ते मुंबईकरांच्या सेवेत अविरत कार्यरत असतात. यासर्व संकाटत ते खचून न जाता सर्वांना पुढे चला पुढे चला हाच संदेश देत असतात. ही सकारात्कता आपण घेतली पाहिजे.
तुमच्यामुळे मी लोकप्रिय मुख्यमंत्री
यावेळी बेस्ट आणि एसटी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या कार्याचे कौतुक मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. यावेळी ते म्हणाले, मुख्यमंत्र्याच्या सोबत सर्व लोक प्राणपणाने उभे राहतात तेव्हा तो मुख्यमंत्री लोकप्रिय होतो. म्हणून तुमच्यामुळे मी लोकप्रिय झालो आहे.
सचिन प्रमाणे मी देखिल ३१५ नंबरच्या बसचा प्रवासी
बेस्ट तर्फे चला पुढे चला या मोहिमेतंर्गत क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांने बेस्टच्या एका जाहिरातीत आपले योगदान दिले आहे. यात तो आपण कसे ३१५ या बसचा प्रवासी होतो व त्यातून तो शिवाजी पार्कला क्रिकेटची प्रॅक्टीस करण्यासाठी प्रवास करायाचे याच्या आठवणी त्याने सांगितल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, मी देखिल बेस्टच्या ३१५ या बसचा प्रवासी होतो. तसेच मुंबईकर असल्याने मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतुकीचा प्रवास केला आहे त्याचा अनुभव घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले