YouTube channels ban : पाकिस्तानसह भारतातील १६ युट्यूब चॅनलवर बंदी ! | पुढारी

YouTube channels ban : पाकिस्तानसह भारतातील १६ युट्यूब चॅनलवर बंदी !

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात ‘प्रोपगंडा’ पसरवणाऱ्या ६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनलसह (YouTube channels ban) भारतातील १० युट्यूब चॅनल माहिती प्रसारण मंत्रालयाच्या आदेशान्वये ब्लॉक करण्यात आले आहेत. जवळपास ६८ कोटींच्या घरात व्युअरशिप असलेल्या या चॅनलचा वापर समाज माध्यमांवर भ्रामक, खोट्या बातम्या पसरवण्यासाठी केला जात असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंबंधी या चॅनलवरून भ्रामक माहिती प्रसारित केली जात आहे. देशाचे परराष्ट्र धोरण, सांप्रदायिक सौहार्द तसेच सामाजिक व्यवस्थेसंबंधी देखील चुकीचे मत या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित केले जात असल्याचा ठपका केंद्राने ठेवला आहे.

बंदी घालण्यात आलेल्या कुठल्याही चॅनलने (YouTube channels ban) आयटी नियम, २०२१ अंतर्गत केंद्र सरकारकडे प्रसारणासंबंधी माहिती सादर केलेली नाही. भारतातून चालवण्यात येणाऱ्या काही युट्यूब चॅनलद्वारे एका विशिष्ट समाजाला दहशतवादी म्हणून संबोधित केले जात आहे. यामुळे वेगवेगळ्या समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साहित्यामुळे समाजात उपद्रव आणि दुदैवी घटनांची स्थिती निर्माण होवू शकते. या सोबतच कायदा-सुव्यवस्था देखील बिघडण्याचा धोका संभावतो. या सर्व बाबी लक्षात घेता हे चॅनल ब्लॉक करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

देशातील काही चॅनलने (YouTube channels ban) कुठल्याही प्रकारची कागदोपत्री कारवाई न करता बातम्याचे प्रसारण केले जात आहे. चुकीचे व्हिडिओ प्रसारित केले जात असल्याने समाजातील वेगवेगळ्या वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण होवू शकते. पाकिस्तान मधील चॅनल भारताविरोधात योजनाबद्धरित्या चुकीची माहिती प्रसारित करीत आहे. देशाचे लष्कर, जम्मू-काश्मीर, परराष्ट्र मंत्रालय, युक्रेन स्थिती सारख्या मुद्दयांवर चुकीची माहिती दाखवली जात आहे. या चॅनचा कन्टेंट पुर्णत: चुकीचा असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा, अखंडतेच्या अनुषंगाने देखील हे योग्य नसल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Back to top button