मुंबई; वृत्तसंस्था : सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामध्ये चेन्नईचा कर्णधार रवींद्र जडेजा आपल्या संघाचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीपुढे नतमस्तक होताना दिसतोय. याच व्हिडीओत चेन्नईचा अंबाती रायडूदेखील धोनीसमोर हात जोडून उभा असल्याचे दिसत आहे.
धोनीने गुरुवारच्या लढतीत मुंबईविरुद्ध चेन्नईला एकहाती विजय मिळवून दिला. चेन्नईला शेवटच्या 4 चेंडूत 16 धावांची गरज असताना धोनीने चौकार आणि षटकार मारून संघाला विजयी केले. त्याने मुंबईच्या जबड्यातून विजय हिसकावून चेन्नईच्या झोळीत टाकला. या सामन्यात मुंबईने 7 गडी गमावून 155 धावा केल्या. 156 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईनेही 16 धावांत 2 गडी गमावले. रॉबिन उथप्पा (30) आणि अंबाती रायडू (40) यांच्या समंजस खेळीने संघाची गाडी पुढे ढकलली; पण धावगती वाढत गेली. एकवेळ चेन्नईला विजयासाठी 24 चेंडूत 48 धावांची गरज होती आणि त्यांचे सहा गडी बाद झाले होते. सामन्याच्या शेवटच्या षटकात 6 चेंडूंत 17 धावांची गरज असताना प्रिटोरियस (22) बाद झाला. सामना जिंकण्याची संपूर्ण जबाबदारी आता धोनीवर आली होती. अशा आव्हानाच्या वेळेलाच नेहमीप्रमाणे धोनीची फलंदाजी बहरली आणि त्याने चेन्नईला अविश्वसनीय विजय मिळवून दिला.
चेन्नईला विजयासाठी चार चेंडूत 16 धावा करायच्या होत्या. खेळपट्टीवर धोनी आणि जयदेव उनाडकट आमने-सामने होते. धोनीने पहिल्या चेंडूवर षटकार, दुसर्या चेंडूवर चौकार, तिसर्या चेंडूवर दोन धावा घेत सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला. शेवटच्या चेंडूवर त्याने जोरदार चौकार मारून विजय खेचून आणला आणि चेन्नईच्या समर्थकांनी सारे स्टेडियम डोक्यावर घेतले.
एम. एस. धोनी… ओम फिनिशाय नमः