देशातील ३६ जिल्ह्यांचा कोरोनासंसर्गदर चिंताजनक! | पुढारी

देशातील ३६ जिल्ह्यांचा कोरोनासंसर्गदर चिंताजनक!

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातील ९ राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने, चिंता व्यक्त केली जात आहे. या जिल्ह्यांचा कोरोना संसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक नोंदवण्यात आला आहे. दर १०० नागरिकांमागे ५ कोरोनाबाधित आढळत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या साप्ताहिक अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे.

केरळमध्ये १४ जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. या जिल्ह्यांचा कोरोना संसर्गदर १४ ते ३१.६४% नोंदवण्यात आला आहे. तर, मिझोरम मधील ८ जिल्ह्यांमध्ये कोरोनासंसर्गदर अधिक नोंदविण्यात आला आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये संसर्गदर १० टक्क्यांहून अधिक आहे.तर, एका जिल्ह्याचा कोरोनासंसर्गदर ६.८७% नोंदवण्यात आला आहे. १३ ते १९ एप्रिल दरम्यानच्या या अहवालानुसार मणिपूर आणि मेघालयामधील प्रत्येकी २ तसेच अरुणाचल प्रदेशातील एका जिल्ह्यातील कोरोनास्थिती चिंताजनक असल्याची बाब समोर आली आहे.

राजधानी दिल्लीतदेखील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. राज्यातील दक्षिण (७.८२%) , पश्चिम (६.३०%), दक्षिण-पश्चिम (५.७८%), उत्तर-पश्चिम (५.७५%) आणि पुर्व दिल्लीचा कोरोनासंसर्गदर ५.३६% नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नोएडात १०.६१%, हरियाणातील गुरूग्राममध्ये ११.०७%, फरीदाबाद चा कोरोनसंसर्गदर ७.१९% नोंदवण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश मधील किन्नोर जिल्ह्यांचा कारोनासंसर्गदर ६.८२ टक्के नोंदवण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button