मुंबई: पुढारी ऑनलाईन
मुंबईत शनिवारी हनुमान चालिसा पठणावरून संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'समोर अपक्ष आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी सकाळी हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे आव्हान दिले आहे. यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्यांना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी 'मातोश्री'समोरच ठाण मांडले आहे. मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे ठेवण्यात आला आहे. दरम्यान, राणा दाम्पत्य सध्या मुंबईतील खार येथील आपल्या निवासस्थानी आहेत. राणांच्या घरांसमोरही शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली असून राणा खाली या असे शिवसैनिकांनी आव्हान दिले आहे.
आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी बॅरिकेडिंग तोडून राणांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला. राणांच्या घरासमोर पोलिसांकडून शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसैनिकांची राणांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. राणा दाम्पत्य जोपर्यंत मुंबई सोडून जात नाहीत तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, अशी आक्रमक भुमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.
मशिदींवरील भोंगे बंद केले नाहीत, तर त्याच मशिदींसमोर वेगळा भोंगा लावून हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. भोंगे उतरवण्यासाठी मनसेने राज्य सरकारला ३ मेची डेडलाईन दिली आहे. हा विषय मशिदींवरील भोंग्यांचा असताना, यात उडी घेत राणा दाम्पत्याने थेट 'मातोश्री'समोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करून या वादाला नवे तोंड फोडले.
राणा दाम्पत्याला अमरावतीतच रोखण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न होता. मात्र, तेथील शिवसैनिकांना गुंगारा देत राणा दाम्पत्य 'मातोश्री' मोहीम फत्ते करण्यासाठी आधीच खार भागातील फ्लॅटवर मुक्कामी दाखल झाले आहे. हे समजताच शिवसैनिकांचा मोठा जमाव त्यांच्या इमारतीसमोर जमला आहे.