औरंगाबाद ; पुढारी वृत्तसेवा : लाकडी दांडक्याने ठेचून आठ ते दहा जणांच्या टोळक्याने तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना शताब्दीनगरमध्ये (बुधवार) रात्री ही घटना घडली. टोळक्याच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कायद्याचा धाक आहे की नाही, असा सवाल मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
मनोज शेषराव आव्हाड (वय 27, रा. मेघावाले सभागृह, एन-12, हडको) असे मृताचे नाव आहे. सतीश खरे, आनंद सोळस, आनंद गायकवाड, सागर खरात, सागरचा भाऊ, अष्टपाल गवई आणि तिघे अनोळखी यांचा संशयित आरोपींमध्ये समावेश आहे. मनोजची आई अरुणा आव्हाड (रा. चंपा चौक, पिवळी कॉलनी) यांनी सिडको ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत मनोज विवाहित असून, तो मेघावाले सभागृहात साफसफाईचे काम करीत होता. 20 एप्रिलला तो आईकडे गेला होता. नातेवाईकांचा शेंद्रा येथे कंदुरी कार्यक्रम असल्याने आई तिकडे गेली होती. त्याचवेळी मंडप लावण्याचे काम करण्यासाठी म्हणून सतीश खरे आणि त्याचे मित्र मनोजला घेऊन गेले होते. त्यांनतर अचानक मनोजला दांड्याने मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. अधिक माहिती घेतल्यावर मनोज मृत झाल्याचे समजले. दरम्यान, या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा वायदंडे करीत आहेत.
दोघांना अटक केल्याचे पोलीस सांगत आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. नातेवाईक मृतदेह घ्यायला तयार नाहीत. पोलीस त्यांची समजूत घालत आहेत. आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी नातेवाईकांची भूमिका आहे. यामुळे या परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.