हेरगिरी बंद करा : संसदेतील गदारोळामुळे दिवसभराचे कामकाज वाया | पुढारी

हेरगिरी बंद करा : संसदेतील गदारोळामुळे दिवसभराचे कामकाज वाया

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी विरोधी सदस्यांनी उभय सदनात प्रचंड गोंधळ घातला. हेरगिरी बंद करा, शेम, शेम आदी घोषणा देत विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

पेगासस हेरगिरी प्रकरणावरून संसदेत निर्माण झालेली कोंडी कायम असून सलग तिसऱ्या आठवड्याचे कामकाज या मुद्दावरून वाया जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अधिक वाचा :

हेरगिरी प्रकरण, कृषी कायदे रद्द करण्यासह इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्या १५ दिवसात गदारोळामुळे कोणतेही कामकाज होऊ शकलेले नाही. ऑलिम्पिक स्पर्धेत ब्रांझ पदक पटविणाऱ्या पी. व्ही. सिंधू हिच्या अभिनंदनाचा प्रस्ताव दोन्ही सदनात मंजूर करण्यात आला. त्यानंतर उभय सदनात प्रश्नोत्तराचा तसेच शून्य प्रहराचा तास गोंधळामुळे वाया गेला.

लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शांत राहून कामकाज नियमित करण्याचे आवाहन विरोधकांना केले, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. सकाळच्या सत्रात गोंधळातच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्रिब्युनल्स रिफॉर्म्स विधेयक सादर केले.

अधिक वाचा :

विरोधकांकडून पर्यायी संसदेचे आयोजन…

विरोधकांचा आवाज ऐकला जात नसल्याचा आरोप करीत संसद भवनाबाहेरच पर्यायी संसदेचे (मॉक पार्लमेंट) आयोजन करण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहे.

पर्यायी संसदेचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मंगळवारी विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठकदेखील बोलाविण्यात आली आहे. 14 विरोधी पक्षांचे नेते या बैठकीत सामील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अधिक वाचा :

Back to top button