नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
भारतात मानवाधिकाराचे (Human Rights) उल्लंघन वाढले असल्याचे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी म्हटले होते. त्यावर आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "लोकांना भारताच्या धोरणांबद्दल मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण त्याचवेळी, भारतालादेखील तितकाच त्यांच्या लोकांबद्दल मत मांडण्याचा समान अधिकार आहे."
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेने भारताबद्दल केलेल्या विधानांवर पहिली अधिकृत प्रतिक्रिया देताना न्यूयॉर्कमध्ये दोन शीख तरुणांवर झालेल्या हल्ल्याचा संदर्भ दिला. सोमवारी अमेरिका आणि भारतीय परराष्ट्र मंत्र्यांमध्ये द्विपक्षीय संवाद झाला होता. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी, अमेरिका भारतातील हल्लीच्या काही मानवाधिकारांसंबंधित घडामोडींवर वर लक्ष ठेवून असल्याचे म्हटले होते. भारतात काही सरकारी, पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्यांकडून मानवाधिकाराचे उल्लंघन वाढले असल्याचे त्यांनी नमूद केले होते.
अँटनी ब्लिंकन ज्यावेळी परिषदेत बोलत होते त्यावेळी एस जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री लॉयड ऑस्टिन उपस्थित होते. पण जयशंकर यांनी या परिषदेत अमेरिकेकडून भारताबद्दल करण्यात आलेल्या टिप्पण्यांवर प्रतिक्रिया दिली नव्हती. पण बुधवारी त्यांनी यावर भाष्य केले.
"हे पहा, लोकांना आमच्या देशाबद्दल मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण त्यांच्या मतांवर आणि हितसंबंधांबद्दल आणि ते करत असलेल्या लॉबी आणि व्होटबँकबद्दल मतं मांडण्याचा आम्हालाही तितकाच अधिकार आहे. त्यामुळे ज्यावेळी चर्चा होत असते तेव्हा मी हे करू शकतो. आम्ही आमची मतं मांडण्यास अजिबात संकोच करणार नाही," असे जयशंकर यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. मंत्रिस्तरीय बैठकीत मानवाधिकाराचा मुद्दा हा चर्चेचा विषय नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.
"आम्ही अमेरिकेसह इतर लोकांच्या मानवाधिकार परिस्थितीबद्दलदेखील (Human Rights) आमचे मत व्यक्त करतो. म्हणून, जेव्हा देशात मानवाधिकाराचा प्रश्न उद्भवतो, विशेषत: जेव्हा तो आमच्या समुदायाशी संबंधित असतो तेव्हा आम्ही तो हाताळतो. वस्तुस्थिती ही आहे की काल आमच्याकडे एक केस होती… खरोखरच आम्ही त्यावर भूमिका घेत आहोत," असेही परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे.
जयशंकर यांच्या बोलण्यात अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधील रिचमंड हिल्स भागातील दोन शीख तरुणांवर हल्ला झाल्याच्या घटनेचा स्पष्ट संदर्भ होता. दोन शीख तरुण पहाटे फिरायला गेले होते. पण त्यांच्यावर हल्ला झाला. १० दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी शीख समुदायाच्या सदस्यांवर हल्ला झाला होता त्याच ठिकाणी दोन शीख तरुणांवर हल्ला करण्यात आला होता. असे असतानाही भारतातील मानवाधिकार उल्लंघनावर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी भाष्य केले. यावर भारताने न्यूयॉर्कमधील द्वेषपूर्ण गुन्ह्याच्या घटनेचा उल्लेख करत अमेरिकेला फटकारले. तसेच त्यांनी अमेरिकेतील मानवाधिकार उल्लंघनांच्या घटनांवर चिंता व्यक्त केली.
ब्लिंकेन म्हणाले होते, "आम्ही भारतातील हल्लीच्या काही मानवाधिकार उल्लंघनाशी संबंधित घडामोडींवर लक्ष ठेवत आहोत. सरकार, पोलिस आणि तुरुंग अधिकाऱ्यांकडून मानवाधिकाराचे उल्लंघन वाढले आहे. यूएस स्टेट डिपार्टमेंटने काल Human Rights Practices या विषयावरील २०२१ चा अहवाल प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी भारतात सरकार अथवा त्यांच्या एजंट्सकडून न्यायबाह्य हत्या आणि मानवाधिकार समस्यांचा उल्लेख केला आहे.
न्यूयॉर्कच्या रिचमंड हिलच्या परिसरात दोन शीख तरुणांवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याच ठिकाणी १० दिवसांपूर्वीही एका शीख तरुणावर हल्ला करण्यात आला होता. याआधी जानेवारीमध्ये, जेएफके आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका शीख टॅक्सी चालकावर हल्ला करण्यात आला होता. हल्लेखोराने त्याला "पगडीधारी लोक" म्हणून संबोधले होते आणि "तुमच्या देशात परत जा" अशी धमकी दिली होती.
हे ही वाचा :