कर्नाटक : ईश्‍वरप्पांचा राजीनामा अनिवार्य? ; काँग्रेस आक्रमक | पुढारी

कर्नाटक : ईश्‍वरप्पांचा राजीनामा अनिवार्य? ; काँग्रेस आक्रमक

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा :

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्याप्रकरणी ग्रामीण विकास आणि पंचायतराजमंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांना राजीनामा द्यावा लागण्याची शक्यता आहे. काँग्रेसने राज्यभर ईश्‍वरप्पांविरुद्ध आंदोलन छेडले आहे. तथापि, ईश्‍वरप्पा राजीनामा न देण्यावर ठाम असल्याने आता लक्ष दिल्लीकडे लागून आहे. भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईश्‍वरप्पांचा राजीनामा घेतला जाणार आहे.

काँग्रेसच्या कार्यकाळात डीएसपी गणपती यांनी आत्महत्या केली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री के. जे. जॉर्ज यांनी राजीनामा दिला होता. त्याच न्यायाने संतोष पाटील यांनी मंत्र्यांवर थेट कमिशनचा आरोप केल्याने त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. कर्नाटकात तापलेल्या वातावरणाची माहिती दिल्लीतील भाजप पक्षश्रेष्ठींनी मागवली आहे. मंत्री ईश्वरप्पांविरुद्ध उडुपी पोलिसांत भादंवि 306 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पक्षश्रेष्ठींना देण्यात आली आहे.

दोन कोटींच्या भरपाईची मागणी

कंत्राटदार संतोष पाटील आत्महत्या प्रकरण सीबीआय किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींकडे सोपवावे. संतोष यांच्या कुटुंबीयांना 2 कोटींची नुकसान भरपाई द्यावी. शिवाय त्यांनी केलेल्या कामाचे सर्व बिल देण्याची मागणी राज्य कंत्राटदार संघाचे अध्यक्ष केंपण्णा यांनी सरकारकडे केली आहे. ते म्हणाले, निविदेसाठी 5 टक्के कमिशनची मागणी केली जाते. आरोग्य खात्यात सर्वाधिक भ्रष्टाचार होत आहे. पाटबंधारे खात्यामध्येही लाच मागितली जाते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना आतापर्यंत चारवेळा तक्रार केली आहे. पण, काहीच उपयोग झाला नाही.

चौकशी करा, राजीनामा नाही ; ईश्‍वरप्पा

कंत्राटदार संतोष पाटील यांना ओळखत नाही. त्यांच्याशी कोणताही व्यवहार केला नाही. असे असतानाही आपले नाव पुढे करून त्यांनी आत्महत्या केली. याबाबतच्या चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे. पण, मंत्रिपदाचा राजीनामा देणार नसल्याचे के. एस. ईश्‍वरप्पा यांनी सांगितले. ते म्हणाले, संतोष यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिलेली नाही. मोबाईलवर संदेश रवाना केला आहे. पण, तो संदेश कुणी पाठवला, याबाबत कोणतेही पुरावे नाहीत. हे राजकीय षड्यंत्र आहे.

ईश्‍वरप्पांच्या पुत्राकडून धमकी ; आ. हेब्बाळकर यांचा दावा

कंत्राटदार संतोष पाटील यांना मंत्री के. एस. ईश्‍वरप्पा यांच्या मुलाने धमकावले होते. शिवाय एका प्रभावी आमदारानेही त्यांना धमकी दिली होती, असा दावा बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला. संतोष यांना धमकावणार्‍यांची नावे लवकरच काँग्रेसकडून जाहीर करण्यात येतील, असेही आ. हेब्बाळकर म्हणाल्या.

Back to top button