भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या वास्‍तव्‍याच्‍या धुळ्यातील बंगल्‍यांमध्‍ये स्‍मृती, न्‍यायालयीन कामकाजानिमित्त दोनवेळा आगमन | पुढारी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या वास्‍तव्‍याच्‍या धुळ्यातील बंगल्‍यांमध्‍ये स्‍मृती, न्‍यायालयीन कामकाजानिमित्त दोनवेळा आगमन

यशवंत हरणे : धुळे

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धुळे येथे दोन वेळा न्यायालयीन कामकाजानिमित्त भेट दिल्‍याची इतिहासात नोंद आहे. या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शनदेखील केले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पदस्पर्शाने पावन झालेला त्यावेळचा ट्रॅव्हल बंगलो म्हणजेच आजची संदेश भूमी व धुळे शहरालगतचा वनक्षेत्रातला लांडोर बंगला येथे स्मारक करण्यात आले आहेत. या स्मारकांवर दररोज अनेक भाविक अभिवादन करुन प्रेरणा घेत आहेत.

न्‍यायालयीन कामकाजानिमित्त धुळे येथे दाेनवेळा आगमन

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे धुळयात ३१ जुलै १९३७ व १७ जून १९३८ रोजी आगमन झाले होते. बैल पोळयाच्या एका केसचे कामकाज पाहण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर धुळयात मुक्कामी आले होते. शिरपूर तालुक्यातील वाघाडी येथील हुलेसिंग मोतीराम जहागीरदार पाटील व मगन मथुरादास वाणी व इतर १४ यांच्यात बैल पोळयाच्या मुददयावरुन वाद झाला होता. यात जहागीरदार यांनी २७ जुलै १९३६ रोजी पोळयाच्या मिरवणुकीत आपले बैल पुढे ठेवण्यासाठीचा अर्ज केला होता. हा अर्ज निकाली काढण्यासाठी तत्कालिन प्रांत यांना सोपवण्यात आला होता; पण हा अर्ज प्रांत यांनी २९ सप्टेंबर १९३६ रोजी नामंजूर करण्यात आला. या निकालाविरोधात जहागिरदार यांनी तत्कालिन जिल्हाधिकारी म्हणजेच जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता.  या अर्जाच्या सुनावणीसाठी जहागीरदार यांचे वकील पी ए तंवर (पाटील), तसेच सी एम मुळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना धुळे येथे न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी आमंत्रित केले होते.

 डाॅ. बाबासाहेब आंबेडकरwww.pudharinews

३१ जुलै १९३७ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे धुळयात आगमन झाले. यावेळी समतावादी दलित मंडळ, प्राणयज्ञ दलाच्या कार्यकत्यांनी त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी चोखपणे पार पाडली होती. यात प्रामुख्याने पुनाजीराव लळींगकर, कॅप्टन भिमराव वस्ताद साळुंखे, सखाराम केदार पहेलवान, सुखदेव केदार पहेलवान, देवरामपंत अहिरे, ए.आर. सावंत व शेकडो कार्यकर्ते त्‍यांच्‍या स्‍वागतासाठी धावपळ करीत होते. बाबासाहेब धुळयात येणार असल्याची वार्ता खान्देशात पोहोचल्याने पहाटे साडेचार वाजल्‍यापासूनच रेल्वे स्टेशनच्या बाहेर जनसमुदाय गोळा होण्यास सुरुवात झाली. सकाळी ८ वाजून 20 मिनिटांच्या सुमारास रेल्वेने डॉ बाबासाहेब आंबेडकर धुळयात आले. यावेळी मोठया जल्‍लोषात त्‍यांचे स्‍वागत करण्‍यात आले.

यावेळी सावंत, ढेगे , बैसाणे, पुनाजीराव लळींगकर, सखाराम केदार, सुखदेव केदार यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली. समतावादी दलित मंडळाचे सेक्रेटरी तुकाराम पहेलवान व चोखामेळा बोर्डींगच्यावतीने सौ पार्वताबाई अहिरे यांनी बाबासाहेबांच्या गळयात पुष्पहार घातले. यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर जनसमुदायाला हास्यवदन करीत दौलत जाधव व दत्तात्रय मागाडे यांच्यासमवेत धुळयाचे प्रेमसिंग तंवर यांनी पाठवलेल्या गाडीतून त्‍यांची ट्रॅव्हल बंगलोपर्यंत मिरवणूक काढण्यात आली हाेती.

राजेंद्र छात्रालयास दिली हाेती भेट

 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर www.pudharinews

न्यायालयीन कामकाज झाल्यानंतर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हरीजन सेवक संघाने सुरु केलेल्या राजेंद्र छात्रालयास भेट दिली. छात्रालयाच्या पुस्‍तिकेत बाबासाहेबांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेला अभिप्राय हा ऐतिहासिक दस्त आज संरक्षित करुन ठेवण्यात आला आहे. यानंतर त्यावेळचे विजयानंतर थिऐटर म्हणजेचे आजचे स्वस्तीक थिएटरमधे डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण ऐकण्यासाठी मोठा जनसमुदाय गोळा झाला होता. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर परतीच्या प्रवासासाठी सायंकाळी रेल्वे स्टेशनकडे रवाना झाले. याच वेळेस गिरणीची सुटी झाल्यामुळे हजारो कामगारांनी बाबासाहेबांचे दर्शन घेत घोषणाबाजी केली. यानंतर बाबासाहेबांनी धुळयातुन प्रस्थान केले. या केसचा निकाल जहागीरदार यांच्या पक्षात झाला आहे.

धुळयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेला ट्रॅव्हल बंगलोमधे आज संदेश भूमी  तयार करण्यात आली असून  वन विभागाचा लांडोर बंगला भागातदेखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर थांबल्याचा इतिहास असल्याने या बंगल्यातदेखील बाबासाहेबांचे स्मारक तयार करण्यात आले आहे. धुळयाच्या राजेंद्र छात्रालय तसेच राजवाडे संशोधन केंद्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या हस्ताक्षरातील संदेश उपलब्ध असून धुळयात जनतेला केलेले मार्गदर्शन डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणांच्या खंड १८ च्या भाग चारमध्‍ये आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या समवेत काम करणारे धुळयातील शेकडो भीमसैनिक तसेच त्याच्यासमवेत संपर्क आलेले वकील प्रेमसिंग तंवर यांना पाठवण्यात आलेले पत्र देखील ऐतिहासिक दस्त असून, या परिवारातील चौथी पिढी विधी क्षेत्रात काम करते आहे. प्रत्येक १४ एप्रिल रोजी धुळयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट दिलेले स्थळास हजारो भीमसैनिक भेट देतात.

हेही वाचा : 

 

 

Back to top button