सुर्डीग्राम पंचायतसह दापोली नगरपंचायतीला ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ | पुढारी

सुर्डीग्राम पंचायतसह दापोली नगरपंचायतीला ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विज्ञान भवन येथे तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन केंद्रीय जलशक्ती मंत्रालाकडून करण्यात आले होते. जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुर्डीग्राम पंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरीसह ग्रामविकास संस्था, औरंगाबाद या अशासकीय संस्थेला मंगळवारी ‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, बिश्वेश्वर टुडू आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

यावेळी ११ श्रेणीत ५७ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या हस्ते देशपातळी प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या राज्य संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्वर‍ित पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप असे होते की, मानचिन्ह, प्रशस्ती पत्र आणि रोख रकम प्रधान करण्यात आले.

पश्चिम झोनमधील उत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीतील तिसऱ्या क्रमांचा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी ग्रामपंचायतला प्रदान मिळाला. हा पुरस्कार ग्रामपंचायतेतील ज्येष्ठ समाज सेवक मधुकर गणपत डोईफोडे आणि प्राचार्य विनायक डोईफोडे यांनी स्वीकारला. सुर्डी या गावाने लोकसहभागातून पाण्याची उपलब्धता वाढवून दुष्काळावर मात केली आहे. सुर्डीमध्ये एकेकाळी दुष्काळाचे सावट होते. मात्र, लोकसहभागातून ६० लाख रूपये एवढा निधी जमा करून, पाण्याच्या पातळी वाढविण्यासंदर्भात कामे केली गेली. याचा परिणाम गावाबाहेर गेलेले लोक पुन्हा परत आलेत. गावाची प्रगती पूर्वीपेक्षा अधिक आहे. गाव आता सदाहर‍ित आणि उत्पन्न वाढणारे झाले असल्याचे डोईफोडे म्‍हणाले.

तसेच, उत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था श्रेणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतला दुसऱ्या क्रमांचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार नगर पंचायत अध्यक्षा ममता बिपीन मोरे, नगर पंचायतचे पाणी पुरवठा अधिकारी स्वप्न‍िल महाकाळ यांनी स्वीकाला. दापोली येथील नारगोली धरण पुनरूज्‍जीवन मोहीम यशस्वी करुन येथील नगरंपचायतीने लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात केली. त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण, खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पाणीसाठयामध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम असा झाला की, नगर पंचायत ही टँकरमुक्त झाली आहे, अशी प्रतिक्रिया श्रीमती ममता मोरे यांनी दिली.

उत्कृष्ट अशासकीय संस्थेच्या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्था गैरसरकारी संस्थेला आणि विवेकानंद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला संयुक्तर‍ित्या तिसऱ्या क्रमांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपूरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

ग्रामविकास संस्था मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मागील दोन दशकांपासून कार्य करीत आहे. औरंगाबादच्या दक्ष‍िणेत असणाऱ्या चित्ते नदी खोऱ्यामध्ये चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियानाचे काम केले. सुरूवातीला पीण्यासाठी, शेतीसाठी, पशुधनासाठी पाण्याचा अभाव होता. जनतेच्या सकात्मक प्रतिसादातून चित्ते नदी खोऱ्यात ‘माथा ते पायथा’ असा शास्त्रीय, तांत्रिक, सामाजिक आणि आर्थिक अभ्यास करून सर्वसमावेशक आराखडा तयार करून कम्पार्टमेंट बाँईडिंग, सीसीटी, नदीपासून १७ किलो मिटरवर २५ स‍िमेंट बंधारे बांधण्यात आले.

नदीचे रूंदीकरणही करण्यात आले. नदीच्या कॅचमेंट परिसरातील २९ पैकी १२ पाझर तलावातील ७० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. २ कोटी ४० लाखाचे काम लोकसहभागातून केलेले आहे. आता या भागातील भूजल पातळी ३ ते ४ मीटर वाढली असल्याचे, शिरपूरे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button