'शरद पवारांना संयु्क्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद द्यावे' | पुढारी

'शरद पवारांना संयु्क्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद द्यावे'

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी मंगळवारी येथे झालेल्या बैठकीत संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात संपुआचे अध्यक्षपद पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देण्यात यावे, अशा आशयाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यादरम्यान यावरून पुन्हा एकदा घमासान माजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे पवार यांच्या उपस्थितीतच वरील प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याने यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

अलीकडेच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले होते. अपयशाची जबाबदारी गांधी कुटुंबियांवर ढकलत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न पक्षातील जी-23 समूह करीत आहे. दुसरीकडे संपुआच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरूनही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

संपुआचे अध्यक्षपद सध्या सोनिया गांधी यांच्याकडे आहे. गेल्या काही काळात काँग्रेसप्रमाणे संपुआ कमजोर झालेली आहे. अशा स्थितीत या आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे दिले जावे, अशी मागणी मध्यंतरीच्या काळात उठली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांना संपुआचे अध्यक्ष बनविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे, हे विशेष.

शरद पवार यांनी महाराष्ट्रात महाआघाडीचा प्रयोग यशस्वी करून दाखविलेला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे संपुआची जबाबदारी दिली जावी, असे गतवर्षी शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले होते. यावर राष्ट्रवादीकडून सावध प्रतिक्रिया देण्यात आली होती. आता खुद्द पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीतच यासंदर्भातील ठराव करण्यात आल्याने त्यावर काँग्रेस कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा 

Back to top button