कल्याण : खाडीत अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई | पुढारी

कल्याण : खाडीत अवैध रेती उपसा करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई

कल्याण, पुढारी वृत्तसेवा : खाडी परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणात अवैध पद्धतीने रेती उपसा होत असते. मंगळवारी दुपारी वाळू उपसा करत असलेल्या रेती माफियांवर तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने कारवाई केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कारवाई दुर्गाडी रेतीबंदर, मोठा गाव परिसर या ठिकाणी करण्यात आली. यावेळी रेती उपसा करणाऱ्यांनी पाण्यात उड्या मारून पळ काढला. रेती (Illegal sand) उपश्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

त्याचबरोबर डोंबिवली येथील मोठा गाव रेतीबंदर परिसर या ठिकाणीही धडक कारवाई करण्यात आली. येथे अवैधरित्या रात्रीच्या सुमारास ड्रेजर्स आणि बाजने रेती उपसा केला जात होता. शेकडो ब्रास काढण्यात आलेली रेती रातोरात हलविली जात होती. रेती उपसा करणारे ड्रेजर्स, बाज, बोटी खाडीच्या पाण्यात मध्यभागी ठेवल्या जात होत्या. त्यामुळे त्या कळून येत नव्हत्या. त्याची माहिती कल्याणच्या तहसीलदारांना मिळताच त्यांनी कारवाई पथकासह धाड टाकली.

थेट खाडीत बोटीने पाहणी करीत असताना त्यांना याठिकाणी अवैध रेती उपसा आढळून आला. कारवाई पथकाने रेती उपसा करणाऱ्या बोटीच्या दिशेने धाव घेतली. हे पाहून बोटीवरील कामगारांनी प्रथम प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पथकाचा आक्रमक पावित्र पाहून कामगारांनी खाडीच्या पाण्यात उड्या घेत पळ काढला. कारवाई पथकाने ७ रेती उपश्याचे पंप, दोन बाज, रेतीची आठ कुंड नष्ट केली. तर जप्त केलेली शेकडो ब्रास रेती पुन्हा खाडीत सोडण्यात आली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button