अति पाणी पिणे संकटास निमंत्रण! किडनीवर होऊ शकतो विपरीत परिणाम | पुढारी

अति पाणी पिणे संकटास निमंत्रण! किडनीवर होऊ शकतो विपरीत परिणाम

पुढारी ऑनलाईन डेस्क :  राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांतील शहरांच्या हवामान केंद्रांवर पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. दिवसेंदिवस उन्हाळ्याच्या झळा वाढत असून, उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी, आरोग्य तज्ज्ञ नेहमी शक्य तितके पाणी पिण्याचा सल्ला देतात. मात्र, जास्त पाणी पिणेही धोकादायक ठरू शकते, असे नव्या संशोधनातून समोर आले आहे.

इंडियन स्पाइनल इंज्युरीज सेंटरचे सल्लागार आणि जनरल यूरोलॉजीचे प्रमुख डॉ. विनित नारंग यांनी याबाबत महत्त्वाची महिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, अति पाणी शरीरासाठी, विशेषतः मूत्रपिंडासाठी चांगले नाही. पाण्याची गरज ओलांडल्याने उत्सर्जन प्रणालीच्या योग्य कार्यामध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते.

जास्त द्रवपदार्थांचा आपल्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो?

जास्त पाणी पिण्यामुळे निर्माण होणारे दुष्परिणाम घातक आहेत. ते जीवघेणेही ठरू शकते. ओव्हरहायड्रेशनमुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचे असंतुलन निर्मण होऊ शकते. पाण्याचे जास्त सेवन केल्याने डायल्युशनल हायपोनेट्रेमिया (रक्तातील सोडियम कमी होणे) आणि अलटर्ड सेन्सॉरियम (मेंदूच्या कार्यामध्ये सामान्य बदल, जसे की गोंधळ, स्मरणशक्ती कमी होणे, सतर्कता कमी होणे, दिशाहीनता, चुकीचा निर्णय किंवा विचार, असामान्य किंवा विचित्र वागणूक, भावनांचे खराब नियमन आणि गोंधळ) होते, अशी माहिती डॉ. नारंग यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

डॉ. नारंग सांगतात की, जेव्हा तुम्ही जास्त पाणी पिता तेव्हा तुमचे मूत्रपिंड जास्त पाणी काढून टाकू शकत नाही. रक्तातील सोडियमचे प्रमाण पातळ होते, ज्यामुळे हायपोनेट्रेमिया नावाची स्थिती उद्भवते. हे जीवघेणे असू शकते. ओव्हरहायड्रेशनमुळे सर्वात जास्त प्रभावित होते ते इलेक्ट्रोलाइट म्हणजे सोडियम. हा एक महत्त्वाचा घटक आहे जो पेशींमध्ये आणि बाहेरील द्रवपदार्थांचे संतुलन राखण्यास मदत करतो. जेव्हा शरीरातील जादाच्या पाण्यामुळे सोडियमची पातळी कमी होते, तेव्हा द्रव पेशींमध्ये प्रवेश करतात. त्यानंतर पेशी फुगतात, ज्यामुळे तुम्हाला फेफरे येण्याचा, कोमात जाण्याचा किंवा मृत्यूचा धोका उद्भवतो. जेव्हा पेशींमध्ये (मेंदूच्या पेशींसह) जास्त पाण्याचा भरणा झाल्यास तेव्हा त्या फुगतात. परिणामी मेंदूतील पेशी फुगल्या की मेंदूवर दबाव निर्माण होतो. त्यामुळे एखाद्याला गोंधळ, तंद्री आणि डोकेदुखीचा अनुभव येऊ शकतो. हा दबाव (hypertension) वाढल्यास उच्च रक्तदाब (High Blood Pressure)) आणि ब्रॅडीकार्डिया (Low Heart Rate) सारख्या परिस्थितींचा सामना करावा लागू शकतो.

डॉ. नारंग म्हणाले, ‘अधिकच्या पाण्याचे सेवन (पॉलिडिप्सिया) करण्याचे घातक परिणाम केवळ तात्पुरते नसून दीर्घकाळापर्यंत मूत्राशयाचे कार्य कायमस्वरूपी बिघडते. वृद्धांसाठी हे फारच घातक ठरू शकते.

तुम्ही जास्त पाणी पिण्याची लक्षणे कोणती?

डॉ. नारंग म्हणाले की, युरीनचा रंग तुमच्या पाण्याचे सेवन टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो, कारण तो अंतर्ग्रहणानुसार बदलतो. तुमची युरीन पांढरी किंवा फिकट पिवळ्या रंगाची असल्यास, सेवन पुरेसे आहे आणि जर ते गडद पिवळे आणि दुर्गंधीयुक्त असेल, तर तुम्हाला पाण्याचे सेवन वाढवावे लागेल.

मळमळ किंवा उलट्या

ओव्हरहायड्रेशनची लक्षणे निर्जलीकरणासारखी दिसू शकतात. जेव्हा तुमच्या शरीरात जास्त पाणी असते तेव्हा किडनी जास्तीच्या द्रवाचे उत्सर्जन करू शकत नाही. ते शरीरात जमा होऊ लागते, ज्यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार होतो.

स्नायूंमध्ये क्रॅम्प

जेव्हा जास्त पाणी प्यायल्यामुळे इलेक्ट्रोलाइटची पातळी कमी होते, तेव्हा तुमचे शरीर संतुलन बिघडते. शरीरात इलेक्ट्रोलाइटची पातळी कमी झाल्यामुळे स्नायूंमध्ये क्रॅम्प येऊ शकतो.

थकवा

जास्त पाणी प्यायल्याने तुमच्या किडनीला जास्त काम करावे लागते. यामुळे एक संप्रेरक प्रतिक्रिया निर्माण होते ज्यामुळे तुम्हाला तणाव आणि थकवा जाणवतो.

किती पाणी पुरेसे आहे?

वेब एमडीनुसार, एखाद्याला दररोज किती पाणी पिण्याची गरज आहे यासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नाहीत. तुमच्या शरीराला किती गरज आहे हे तुमच्या शारीरिक हालचालींची पातळी, हवामान, शरीराचे वजन, लिंग यावर अवलंबून असते. १९ ते ३० वयोगटातील महिलांनी दररोज सुमारे २.७ लिटर पाणी प्यावे. त्याच वयोगटातील पुरुषांना सुमारे ३.७ लिटर आवश्यक आहे.

Back to top button