पंतप्रधान आवास योजना ही गरिबांना सशक्त बनविण्याची योजना : पंतप्रधान मोदी | पुढारी

पंतप्रधान आवास योजना ही गरिबांना सशक्त बनविण्याची योजना : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान आवास योजना ही गरिबांना सशक्त बनविण्याची योजना असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि.२९ ) केले. मध्य प्रदेशात या योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या 5.21 लाख घरांचा ताबा देण्याच्या कार्यक्रमावेळी मोदी बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांनी मार्गदर्शन केले.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मध्य प्रदेशातील मागास अशा सहरिया, बैगा आणि भारिया समाजातील आदिवासींना घरे देण्यात आली असल्याचे सांगून मोदी म्हणाले की, ज्या लोकांनी कधी आयुष्यात पक्क्या घराचा विचार केला नसेल अशा लोकांना सरकारने घरे दिली आहेत. योजनेमुळे असंख्य महिला लखपती झाल्या आहेत. आपल्या देशात काही पक्षांनी यापूर्वी गरिबी दूर करण्याच्या घोषणा दिल्या; पण गरिबांना सशक्त केले नाही. गरीब माणूस जेव्हा सशक्त होतो तेव्हा त्याच्यात लढण्याची ताकद येते.

गरिबांना पक्की घरे देण्याची योजना ही केवळ सरकारी योजना नाही तर गाव आणि गरिबांप्रतीची सरकारची कटिबद्धता आहे. गरिबाच्या डोक्यावर पक्के छत असते, तेव्हाच तो आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊ शकतो, इतर कामे करू शकतो. आधीच्या सरकारांच्या काळात काही लाख घरांची निर्मिती झाली तर आमच्या सरकारच्या काळात अडीच कोटी घरे बनविण्यात आली आहेत. यातील सुमारे दोन कोटी घरे ग्रामीण भागात आहेत.

कोरोनाचे संकट असूनही पंतप्रधान आवास योजना वेगाने राबविली जात आहे, असे सांगत मोदी म्हणाले की, योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या घरांपैकी असंख्य घरांची मालकी महिलांना देण्यात आली आहे. थोडक्यात सरकारने महिलांची भागीदारीदेखील मजबूत केली आहे. हा जगातील कोणत्याही विद्यापीठाच्या संशोधनाचा विषय होऊ शकतो. मध्य प्रदेशातील विद्यापीठांनी देखील यावर संशोधन करावे, असे आवाहनही त्‍यांनी केले.

हेही वाचलं का?  

Back to top button