तेलबिया स्वस्त मात्र खाद्यतेल महाग! उत्पादकांना बसतोय फटका | पुढारी

तेलबिया स्वस्त मात्र खाद्यतेल महाग! उत्पादकांना बसतोय फटका

सांगली; विवेक दाभोळे : तेलबिया, तेलपिकांचे दर कमी होत आहेत. तर बाजारात युक्रेन युध्दाच्या नावाखाली खाद्यतेलांच्या दरातील तेजी कायम आहे. तेलाचे दर तेजीत आहेत. मात्र तेलबिया पिकांच्या हमीभावात मात्र जेमतेम वाढ केली जाते. त्याचा फटका बसून तेलबियाखालील क्षेत्र घटते आहे.

सहा महिन्यांपासून खाद्यतेलाच्या दरात एकच वाढ होत होती. तब्बल 70 रुपये प्रतिकिलो दरात वाढ झाली. एकीकडे खाद्यतेलांचे दर वाढत असताना तेलबिया पिकांचे हमीभाव मात्र तुलनेने वाढवले जात नाहीत. या पिकांच्या हमीभावात जेमतेम वाढ केली जाते. यातूनच देशात खाद्य तेल बनविण्यासाठी तेलबियांचा तुटवडा भासतो. 75 टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. दोन वर्षांपासून सातत्याने विविध नैसर्गिक संकटांमुळे तेलबिया पिकांचे प्रामुख्याने सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल आदी पिकांचे नुकसान झाले. कोरोना, लॉकडाऊनचा तेलबिया पिकांना फटका बसला. यातून तेलउत्पादन देखील घटले, मात्र याऊलट मागणीत वाढच होत गेली. परिणामी तेलाचे दर वाढत गेले. यासाठी शासनाने तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढावे यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. तसेच सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल आदींच्या आधारभूत किंमती वाढविण्याची गरज आहे. तरच शेतकरी या पिकांकडे आणखी वळू शकेल.

खाद्येतलाची देशात 105 लाख टन निर्मिती होते तर 145 लाख टन आयात करावी लागते. खाद्यतेलासाठी आयातीवर अवलंबून राहणे हे धोकादायक ठरते. यासाठीच तेलबियांच्या आधारभूत किंमतीमध्ये भरीव वाढ करण्याची गरज आहे. सन 2020-2021 च्या हंगामासाठी सोयाबीनसाठी 70 रुपये, भुईमूग 277 रुपये, मोहरी 400 रुपये आणि सूर्यफूल 130 रुपये , करडईसाठी 114 रुपये अशी प्रतिक्विंटल वाढ केली. ही दरवाढ फक्त 2 ते 5 टक्के आहे. खाद्यतेलाचे दर मात्र 30 ते 40 टक्के वाढले आहेत. याचा विचार करता तेलबियांच्या पीकक्षेत्रात वाढ करण्याची गरज आहे. तेलबिया पिकांच्या दराची बाजारात हमी राहत नसल्याने शेतकरी या पिकांच्या उत्पादनाकडे वळत नाही. यातूनच खाद्यतेलासाठी आयातीवर अवलबूंन राहणे भाग पडते. याचा विचार करून शासनाने किमान जून 2022 पासूनच्या खरीप हंगामात तरी सोयाबीन, भुईमूग, सूर्यफूल यांच्या आधारभूत किंमती वाढविण्याची गरज आहे. तशी मागणी देखील होत आहे.

मध्यप्रदेशात होता रेकॉर्ड ब्रेक दर

सप्टेंबर 2021 मध्ये सोयाबीनला सांगली जिल्ह्यात दहा मॉईश्चरसाठी 9 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. मात्र त्याचवेळी दहा मॉईश्चरसाठी मध्यप्रदेशात मात्र तब्बल 16 हजार 151 रुपयांचा रेकॉर्डब्रेक दर मिळाला होता. मध्यप्रदेशातील रतलाम जिल्ह्यातील सैलाना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दि. 17 सप्टेंबररोजी झालेल्या सौद्यात हा दर मिळाला. हा दर देशातील उच्चांकी ठरला आहे. मात्र जर मध्यप्रदेशातील व्यापारी सोयाबीनला 16 हजार 151 रुपये असा भाव देत असतील तर मग सांगली जिल्ह्यातील सोयाबीनला हा दर का मिळू शकत नाही, असा सवाल केला जात आहे.

तेलबिया हमीभाव रु. (सन 2021-2022)

  • सोयाबीन : रु. 3950
  • भुईमूग : रु. 5550
  • मोहरी : रु. : 5050
  • सूर्यफूल : रु. 6015
  • करडई : रु. 5441

Back to top button