नाशिक : मोफत रेशन मुदतवाढीचा तब्बल ‘इतक्या’ लाख नागरिकांना मिळणार फायदा | पुढारी

नाशिक : मोफत रेशन मुदतवाढीचा तब्बल 'इतक्या' लाख नागरिकांना मिळणार फायदा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत रेशनला पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. नव्या आदेशानुसार, गरजूंना सप्टेंबरपर्यंत मोफत धान्य मिळणार असून, नाशिक जिल्ह्यातील 37 लाख लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे. दरम्यान, मुदतवाढीबद्दल जिल्हा पुरवठा विभागाला अद्याप कोणतेही आदेश मिळालेले नाहीत.

चीन, इस्रायलसह अनेक देशांमध्ये कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या देशांमध्ये कोरोनाचा डेल्टाक्रॉन हा नवीन व्हेरियंट आढळून आला आहे. भारतात काही राज्यांमध्ये या नव्या व्हेरियंटचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. देशात सध्याच्या परिस्थितीत चौथ्या लाटेची शक्यता नसली, तरी शासनाकडून मात्र, सर्वतोपरी खबरदारी घेण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार महिन्याकाठी नियमितसह लाभार्थ्यांना पाच किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. त्यामध्ये तीन किलो गहू व दोन किलो तांदळाचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्डधारक असलेल्या साधारणत: 37 लाख लाभार्थ्यांना सरकारच्या निर्णयामुळे फायदा होणार आहे.

दोन वर्षांचा कालावधी पूर्ण
देशात कोरोना प्रादुर्भावाच्या शिरकावाला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. या कालावधीत शासनाने मोफत धान्याला वारंवार मुदतवाढ दिली आहे. चालू वर्षी मार्चएण्डपर्यंतच्या मोफत धान्याच्या निर्णयात सरकारने पुन्हा एकदा सहा महिन्यांची मुदत वाढविली आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी गोरगरीब, गरजू लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळणार आहे.

हेही वाचा :

Back to top button