सिरो सर्वेक्षण : राज्यातील ५८% नागरिकांमध्ये आढळल्या अँटीबॉडी! | पुढारी

सिरो सर्वेक्षण : राज्यातील ५८% नागरिकांमध्ये आढळल्या अँटीबॉडी!

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : सिरो सर्वेक्षण : कोरोना महारोगराईचा सर्वाधिक फटका सहन केलेल्या महाराष्ट्रातील ५८% नागरिकांमध्ये अँटीबॉडी आढळल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, बिहार तसेच इतर राज्यांत ७० % नागरिकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडी आढळून आल्या. सर्वाधिक कोरोनाबाधित आढळणाऱ्या केरळ राज्यात ४४.४ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडी आढळून आल्या.

भारतीय वैज्ञानिक संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) करण्यात आलेल्या सिरो सर्वेतून ही आकडेवारी समोर आली. १४ जून ते १६ जुलै दरम्यान करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ६ ते १७ वर्षांच्या बालकांना देखील समाविष्ठ करण्यात आले होते.

सिरो सर्वेचा अहवाल हाती आल्यानंतर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्यासह कोरोना नियामांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. देशातील ७० जिल्ह्यांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले होते. आयसीएमआरच्या या चौथ्या सिरो सर्वेक्षणात परिषदेचे महारोगराई विज्ञान विभागाचे प्रमुख समीरन पांडा देखील सहभागी झाले होते.

लोकसंख्येच्या आधार सर्वेक्षणासाठी​ जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. काही राज्यातील जास्त जिल्ह्यांना त्यामुळे सर्वेक्षणात सामिल करण्यात आले होते, असे पांडा म्हणाले.

यापूर्वी ​तिन्ही सिरो सर्वेक्षणात सहभागी असलेल्या जिल्ह्यांमध्येच चौथ्या सिरो सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणात प्रत्येक जिल्यातील १० गाव अथवा वार्ड मधील प्रत्येकी ४० नागरिकांची निवड करण्यात आली होती, असे पांडा म्हणाले.

देशातील ४० कोटी म्हणजेच ३३% नागरिकांमध्ये कोरोनाची अँटीबॉडी आढळली नाही, असे आयसीएमआरचे महासंचालक बलराम भार्गव यांनी गेल्या आठवड्यात सिरो सर्वे सादर करतांना स्पष्ट केले होते. अशात यांना कोरोना संसर्गाची लागण होण्याचा धोका आहे.

लस न घेणाऱ्या ६२.३ टक्के नागरिकांमध्ये कोरोनाची अँटीबॉडी आढळून आली आहे. लशीचा एक डोस घेणारे ८१ टक्के आणि दोन घेणार्या ८९.९ टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडी आढळल्याचे दिसून आले होते. अशात इतर नागरिकांच्या बचावासाठी वेगाने लसीकरण करण्याची गरज सिरो सर्वेमुळे निर्माण झाली आहे.

कुठल्या राज्यात किती टक्के नागरिकांमध्ये अँटीबॉडी ?

राज्य           टक्केवारी

१) मध्य प्रदेश     ७९%

२) राजस्थान       ७६%

३) गुजरात          ७५.३%

४) बिहार            ७५%

५) छत्तीसगड       ७४.६%

६) उत्तर प्रदेश      ७१%

७) हिमाचल प्रदेश  ६२%

८) झारखंड           ६१.२%

९) हरियाणा           ६०.१%

१०) महाराष्ट्र            ५८%

हे ही वाचलं का? 

Back to top button