खुशखबर : ‘या’ महिन्यापासून मिळणार मुलांना कोरोना लस | पुढारी

खुशखबर : ‘या’ महिन्यापासून मिळणार मुलांना कोरोना लस

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा:  देशातील १२-१७ या वयोगटातील मुलांना कोरोना लस देण्याचे संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिले आहेत.  संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी  लहान मुलांना कोरोना लस देणे गरजेचे असल्याचे मत मांडविया यांनी दिले.

भाजप संसदीय पक्षाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झाली. या बैठकीतही याबाबत चर्चा करण्यात आली.

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आरोग्य मंत्रालयाने तयारी केली असून १२ ते १७ या वयोगटातील मुलांचे लसीकरण लवकरच सुरू होईल, असे मंडाविया यांनी यावेळी सांगितले.

भारत हा मोठा लस उत्पादक देश असून, आणखी काही कंपन्यांच्या लशींना लवकरच परवानगी लवकरच मिळेल, असेही ते म्हणाले. याआधी १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण जुलै किंवा ऑगस्टपासून सुरू होईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.

१२-१७ वयोगटातील मुलांना लस देण्याआधी त्याच्या लवकर चाचण्या घेण्यात याव्यात आणि त्यानंतरच लसीकरण करावे, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला दिले होते.

झायडसच्या लसीला लवकरच मंजुरी

देशात भारत बायोटेकची कोव्हॅक्सीन आणि झायडस कॅडिला या लशींची मुलांवर चाचणी सुरू आहे.

१२ वर्षांपुढील मुलांसाठी झायडस कॅडीला लस लवकरच उपलब्ध होईल, असे केंद्राने सुप्रीम कोर्टात सांगितले होते.

ही लस सप्टेंबरपासून मुलांना देण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी जुलैच्या सुरुवातीला सांगितले होते.

कोव्हॅक्सीनच्या चाचणीचे काय परिणाम होतात याचे निष्कर्ष सप्टेंबपर्यंत मिळतील, असे ‘एम्स’चे प्रमुख रणदीप गुलेरिया यांनी सांगितले होते.

मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यास तिसऱ्या लाटेचा यशस्वी सामना करू शकतो, असेही गुलेरिया म्हणाले.

शाळा सुरू होण्याचे संकेत…

कोरोनामुळे दोन शैक्षणिक वर्षे शाळा बंद आहे. शाळा सुरू करायच्या असतील तर मुलांचे लसीकरण करणे हा एकमेव उपाय सध्या असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

त्यामुळे मुलांच्या लसीकरणानंतर शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा होण्याची आशा आहे.

हेही वाचले का

Back to top button