अमेरिकेत आला मृत व्यक्तींना ‘डिजिटली जिवंत’ करण्याचा ट्रेंड | पुढारी

अमेरिकेत आला मृत व्यक्तींना ‘डिजिटली जिवंत’ करण्याचा ट्रेंड

वॉशिंग्टन : अमेरिकेत आता अनेक मृत आणि नामवंत व्यक्तींना ‘डिजिटली जिवंत’ करण्याचा ट्रेंड आला आहे. ख्यातनाम शेफ आणि टीव्ही प्रेझेंटर अँथनी बोर्डेन यांच्यावर बनवण्यात आलेल्या डॉक्युमेंटरीला त्यांचा ‘डिजिटल पुनर्जन्म’ म्हणूनच पाहिले जात आहे.

‘रोडरनर’ नावाच्या या डॉक्युमेंटरीमध्ये 45 सेकंदांपर्यंत त्यांचा आवाज आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने सादर करण्यात आला. खुद्द बोर्डेनच बोलत असल्याचा भास यामुळे अनेकांना झाला.

डॉक्युमेंटरीचे दिग्दर्शक मॉर्गन नेवील यांनी सांगितले की, अशा महान व्यक्तींना डिजिटल स्वरूपात पुनजीर्वित करण्यासाठी एक पॅनेल बनवण्याचा काळ आला आहे. 2 डी, 3 डी, होलोग्राम आणि एआय तसेच चॅटबॉटद्वारे आपण त्यांना पुन्हा ‘जिवंत’ करू शकतो.

‘एआय’च्या द्वारे एखाद्या व्यक्तीला असे पुन्हा लोकांसमोर आणण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी रॅपर टूपॅक शकूरला मंचावर होलोग्रामच्या सहाय्याने त्याच्या मृत्यूनंतर पंधरा वर्षांनी पुन्हा आणण्यात आले.

19 वर्षांचा आर्डे हेपबर्न 2014 च्या गॅलेक्सी चॉकलेटच्या जाहिरातीत आणि कॅरी फिशर व पीटर कुशिंग मृत्यूनंतरही ‘स्टार वॉर्स’ चित्रपटात आपापल्या भूमिकेत दिसून आले होते.

‘कान्ये वेस्ट’ने किम कर्दाशियनच्या वाढदिवशी तिच्या दिवंगत वडिलांना होलोग्राम छबीच्या सहाय्याने तिच्यासमोर आणले होते. तिने म्हटले होते की, माझे स्वर्गीय पिता स्वर्गातून थेट आपल्यापुढे अवतरित झाल्यासारखे मला वाटले!

डिजिटल पुनर्जन्माबाबत अमेरिकेत अनेक प्रकारची चर्चा सुरू आहे. मृत्यूनंतर आपल्या डाटाचे काय होणार हा प्रश्नही सध्याच्या आधुनिक काळात आहे.

मृत्यूनंतर आपले ई-मेल, टेक्स्ट मेसेज, सोशल मीडिया प्रोफाईल, सर्च प्रोफाईल, फोटो हे सगळे इथेच सोडून आपण निघून जात असतो. अशा तमाम डिजिटल अवशेषांचे डॉक्युमेंटेशन झाले पाहिजे, असे तज्ज्ञ डॉ. कार्ल ओहमॅन यांनी म्हटले आहे. एका पाहणीनुसार शतकाच्या अखेरपर्यंत फेसबुकजवळ 490 कोटी मृत व्यक्तींचा डाटा असेल!

Back to top button