बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, आज शपथविधी

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, आज शपथविधी
Published on
Updated on

बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ राजकारणी, प्रभावी लिंगायत नेते, दीर्घ राजकीय अनुभव असणारे नेते आणि येडियुराप्पांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री राहिलेले बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असतील. मंगळवारी सायंकाळी येथील खासगी हॉटेलमध्ये झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत कर्नाटकाचे भाजप प्रभारी अरुण सिंग यांनी बसवराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान, कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई आज बुधवारी सकाळी ११ वाजता शपथ घेणार आहेत.

त्याबरोबर नव्या तरुण नेत्याला संधी दिली जाण्याच्या शक्यतेला विराम मिळाला. शिवाय केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांनाही राज्यात आणली जाण्याची शक्यता मावळली.

भाजपने नव्या मुख्यमंत्र्याची निवड करताना ज्येष्ठ नेते आणि काळजीवाहू मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचेही मत विचारात घेतल्याचे दिसते. बुधवारी 28 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे 31 वे मुख्यमंत्री म्हणून बसवराज बोम्मई शपथ घेतील.

कर्नाटकला 28 जुलै रोजी नवा मुख्यमंत्री मिळेल, असा अंदाज दै. 'पुढारी'ने 20 जुलै रोजीच प्रसिद्ध केला होता. आज तो खरा ठरला. बुधवारी शपथबद्ध झाल्यानंतर नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होईल. त्यात जुन्या मंत्र्यांना वगळले जाण्याचे संकेत आहेत.

श्रेष्ठींच्या सूचनेनुसार येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सुमारे अर्धा डझन नेत्यांनी नवी दिल्‍लीपर्यंत लॉबिंग केले होते; पण येडियुराप्पा यांचे निकटवर्तीय असणारे बसवराज बोम्मई यांना संधी देण्यात आली.

याआधीचे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अनेक आमदारांनी आपल्या गॉडफादरमार्फत दिल्‍लीतील श्रेष्ठींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.

भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी. एल. संतोष, केंद्रीय कायदामंत्री प्रल्हाद जोशी, आमदार अरविंद बेल्‍लद, भाजपचे राष्ट्रीय सचिव सी. टी. रवी, आमदार मुरुगेश निराणी यांच्यासह काहीजण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. अखेरच्या क्षणी बोम्मई आणि बेल्‍लद आघाडीवर होते.

भाजप विधिमंडळ बैठक सुरू झाल्यानंतर काही क्षणांतच पक्षाचे कर्नाटक प्रभारी अरुण सिंग यांनी बोम्मई यांच्या नावाची घोषणा केली. विधिमंडळ बैठक सुरू होईपर्यंत श्रेष्ठींनी दिलेला संदेश कुठेही उघड होणार नाही याची दक्षता घेण्यात आली होती.

भाजप श्रेष्ठींच्या आदेशानुसार निरीक्षक म्हणून धर्मेंद्र प्रधान, अरुण सिंग आणि किशन रेड्डी मंगळवारी बंगळुरात दाखल झाले. दिवसभर त्यांनी सर्व आमदारांच्या बैठका घेतल्या. सायंकाळी विधिमंडळ बैठकीत बसवराज बोम्मई यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर त्यांचे अभिनंदन केले.

बी. एस. येडियुराप्पा यांना वयाची पंच्याहत्तरी ओलांडल्यानंतरही त्यांना दोन वर्षे मुख्यमंत्रिपद देण्यात आले. शिवाय त्यांच्यासह कुटुंबीयांवर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतरही काही काळ त्यांना श्रेष्ठींनी अभय दिले. अखेर भाजप सत्तेच्या द्विवर्षपूर्तीदिनी 26 जुलै रोजी त्यांनी राजीनामा दिला.

गेल्या काही महिन्यांपासून येडियुराप्पांना पायउतार व्हावे लागणार असल्याची जाहीर विधान आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, सी. पी. योगेश्‍वर व इतर आमदारांनी केली होती. काहीजणांनी श्रेष्ठींपर्यंत येडियुराप्पांसह कुटुंबीयांविरुद्ध तक्रार केली होती. याची दखल घेऊन श्रेष्ठींनी पद सोडण्याची सूचना येडिंना दिली होती.

पुन्हा तीन उपमुख्यमंत्रिपदे?

नव्या मुख्यमंत्र्यांच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये अनेक बदल दिसणार आहेत. जुन्या मंत्र्यांपैकी काहींना वगळून युवा नेत्यांना संधी देण्यात येणार आहे.

आगामी निवडणुका लक्षात घेऊन मंत्रिमंडळ स्थापन केले जाणार आहे. इतर पक्षांतून आलेल्या 17 जणांपैकी काहींना वगळण्यात येणार आहे. एकूण सुमारे 15 नवे चेहरे मंत्रिमंडळात दिसण्याची शक्यता आहे.

श्रेष्ठींनी ठरवल्यानुसार 60 टक्के युवा आणि 40 टक्के ज्येष्ठ आमदारांना संधी मिळणार आहे. याआधीप्रमाणेच तीन उपमुख्यमंत्रिपदे कायम ठेवण्यात येणार असून आर. अशोक, श्रीरामुलू आणि गोविंद कारजोळ यांना हे पद मिळणार आहे.

बी. एस. येडियुराप्पा यांचे उतारवय आणि त्यांच्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे भाजप श्रेष्ठींनी त्यांना पद सोडण्याची सूचना केली. त्यानुसार त्यांनी पदत्याग केला. त्यांच्यासह मंत्रिमंडळही विसर्जित झाले. आता नवे मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे. याआधीच्या मंत्रिमंडळात असणार्‍या काही अकार्यक्षम आणि वयस्कर आमदारांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता नाही.

पुढील 15 वर्षे पक्षासाठी सक्रियपणे कार्यरत राहून संघटना करणार्‍यांना संधी देण्यात येणार आहे. सरकारची प्रतिमा, पक्षाचे वर्चस्व वाढवण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून प्रत्येक पाऊल उचलण्यात येत आहे.

शिक्षण, संघटनाचातुर्य, लोकांमध्ये मिसळणार्‍याला संधी मिळू शकते. दरवेळी मंत्रिमंडळामध्ये ज्येष्ठांना प्राधान्य दिले जाते. यावेळी 60 टक्के युवा आणि 40 टक्के ज्येष्ठांना मंत्रिपद देण्यात येणार आहे.

यांना वगळणार..?

के. एस. ईश्‍वरप्पा, जगदीश शेट्टर, एस. सुरेशकुमार, व्ही. सोमण्णा, लक्ष्मण सवदी, सी. सी. पाटील, प्रभू चव्हाण, शशिकला जोल्‍ले यांच्यासह इतर पक्षांतून आलेले श्रीमंत पाटील, शंकर, नारायणगौडा.

यांना संधी शक्य

भालचंद्र जारकीहोळी, चंद्रप्पा, पौर्णिमा श्रीनिवास, अप्पच्चू रंजन, सुनील कुमार, राजू गौडा, पी. राजीव, दत्तात्रेय पाटील, सतीश रेड्डी, मुनीरत्न, शिवनगौडा नायक, रामदास, हालप्पा आचार्य, कुमार बंगारप्पा, बी. सी. नागेश, हालाडी श्रीनिवास शेट्टी, ए. एस. गोपाल नडहळ्ळी.

मंत्रिपदासाठीचे निकष

मंत्रिपदासाठी श्रेष्ठींनी काही निकष लावले आहेत. पारदर्शक कारभार, स्वच्छ राजकारणी, कोणताही आरोप असू नये, वैयक्‍तिक किंवा कुटुंबीयांचा भ्रष्टाचारामध्ये सहभाग असू नये. 75 वर्षांवरील आमदारांना मंत्रिपद देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

पिता-पुत्राची दुसरी जोडी

बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. जनता परिवारातून निवडून आलेले त्यांचे वडील एस. आर. बोम्मई 1988-99 मध्ये मुख्यमंत्री होते. वडिलांनी मुख्यमंत्रिपद सांभाळल्यानंतर आता मुलालाही हे पद मिळण्याची कर्नाटकातील ही दुसरी वेळ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news