रामराजे यांचा हिस्टॉरिकल आराखडा : फलटणसह ऐतिहासिक ठिकाणे होणार पर्यटन केंद्रे | पुढारी

रामराजे यांचा हिस्टॉरिकल आराखडा : फलटणसह ऐतिहासिक ठिकाणे होणार पर्यटन केंद्रे

फलटण : पुढारी वृत्तसेवा

विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी हिस्टॉरिकल आराखडा मांडत फलटणसह आसपासची ऐतिहासिक ठिकाणे होणार पर्यटन केंद्रे करणार असल्याची माहिती दिली.

राज्यामधील विविध पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी विविध योजना आखलेल्या आहेत. त्यामध्ये फलटणला मध्यवर्ती केंद्र मानून फलटणसह आजूबाजूच्या पर्यटन स्थळांचा विकास साधायचे निश्चित केले आहे. फलटणसह आजूबाजूच्या गावांमधील ऐतिहासिक व पर्यटनाच्या दृष्टीने योग्य असलेली स्थळे ही आगामी काळामध्ये पर्यटन स्थळे म्हणून विकसित करण्यात येणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

फलटण येथील मुधोजी मनमोहन राजवाडा येथे ना. रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. यावेळी नगरसेविका सुभद्राराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, विक्रमसिंहराजे भोसले, दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, शामसुंदर शास्त्री, मंगेश दोषी, हर्षाकुमारी सिंग, नगरसेवक अजय माळवे, दादासाहेब चोरमले उपस्थित होते.

ना. रामराजे म्हणाले, फलटण मधील ऐतिहासिक असलेल्या श्री मुधोजी मनमोहन राजवाडा, नागेश्वर मंदिर, श्रीराम मंदिर, जबरेश्वर मंदिर, महानभव पंथाची दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या चक्रधर स्वामी मंदिर, आबासाहेब मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, जैन धर्मियांचे श्री 1008 चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर, श्री 1008 आदिनाथ दिगंबर जैन मंदिर, श्री बिरदेव मंदिर, श्री भिवाई माता मंदिर, श्री धुळदेव मंदिर यांचा समावेश सदरील डॉक्युमेंट्री करण्यात येणार आहे.

या शिवाय महाराष्ट्राचे लोकनृत्य समजले जाणारे धनगर समाजाचे गजी नृत्य सुद्धा सदरील डॉक्युमेंट्रीमध्ये दाखवले जाणार आहे. तसेच फलटण तालुक्यामधील विविध फळबागांची माहिती यात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे ना. रामराजे यांनी स्पष्ट केले. ना. रामराजे म्हणाले, वेळापूर ता. माळशिरस येथील अर्धनारीनटेश्वर मंदिर, सातारा तालुक्यातील लिंब येथील बारामोटेची विहीर, औंध ता. खटाव येथील मूळपीठ श्री यमाई मंदिर, वास्तू संग्रहालय, शिखर शिंगणापूर ता. माण येथील श्री शंभू महादेवाचे मंदिर, गोंदवले ता. माण येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे समाधी मंदिर यांचा समावेशही करण्यात येणार आहे.

आगामी काळामध्ये फलटणसह परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने परिपूर्ण विकास साधण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Back to top button