टोकियो : जपानी लोक (जर त्यांनी आत्महत्या केली नाही तर) बरेच दीर्घायुष्यी होत असतात. त्यांचा आहार-विहार यासाठी कारणीभूत असतो हे यापूर्वीच स्पष्ट झालेले आहे.
आता एका नव्या संशोधनातून असे दिसून आले की, जपानी लोक नाश्त्यासाठी ज्या फर्मेंटेड सोयाबिन डिशचे सेवन करतात, ती त्यांच्या दीर्घायुष्यासाठी अधिक कारणीभूत ठरते.
सध्याच्या कोव्हिड महामारीच्या काळात ही डिश रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अधिक उपयुक्त ठरू शकते, असेही संशोधकांना वाटते.
'बायोकेमिकल अँड बायोफिजिकल रिसर्च कम्युनिकेशन्स' या नियतकालिकात याबाबतच्या संशोधनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या डिशचे नाव आहे 'नट्टो' किंवा 'नाट्टो'. बॅक्टेरिया बॅसिलस सबटिलिसबरोबर फर्मेंटिंग सोयाबिनसह ही डिश बनवली जात असते.
जपानचे लोक दीर्घकाळापासून अशा पारंपरिक डिशचा उपयोग नाश्त्यासाठी करीत आले आहेत. त्यामुळे त्यांना उत्तम आरोग्याचा आणि पर्यायाने दीर्घायुष्याचाही लाभ होतो.
जपानमधील बहुतांश लोक दीर्घायुष्यी असतात आणि बहुतांश घरांमध्ये नट्टोचे सकाळच्या नाश्त्यासाठी सेवन केले जाते. या खाद्यपदार्थामुळे स्ट्रोक किंवा हृदयविकाराने मृत्यू येण्याचा धोका कमी असतो. मात्र हा पदार्थ जपानी लोकांशिवाय इतरांना किती आवडेल हा एक प्रश्नच आहे.
याचे कारण म्हणजे या पदार्थातून अमोनियासारखी दुर्गंधी येते आणि तो अतिशय चिकट, बुळबुळीत असतो. त्याची चवही अनेकांना आवडणार नाही अशी असते. मात्र आरोग्यासाठी हा पदार्थ अत्यंत लाभदायक ठरतो.