

ओस्लो : नॉर्वे च्या आसमंतात एक मोठी उल्का कोसळत असताना दिसून आली. मोठा गडगडाट आणि झगमगाटासह ही उल्का कोसळली. तिचा काही भाग राजधानी ओस्लोच्या जवळ पडला असावा, असे तज्ज्ञांना वाटते. या उल्कापातामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
उल्का दिसल्याचे वृत्त आधी ट्रोनधेम शहरातून आले. होलमेस्ट्रँड परिसरातील एका वेब कॅमेर्याने आकाशातून कोसळत असलेल्या आगीच्या गोळ्याला टिपून घेतले.
या उल्केचे मूळ आणि ती नेमकी कुठे कोसळली याचा आता तपास केला जात आहे. ओस्लोपासून 60 किलोमीटरवर असलेल्या फिनेमार्काच्या जंगल परिसरात ही उल्का कोसळल्याचे सुरुवातीच्या चौकशीतून समोर आले आहे.
उल्कापाताशी संबंधित विभागाचे मोर्टेन बिलेट यांनीही ही उल्का कोसळत असताना पाहिली व ती अतिशय वेगवान होती, असे त्यांनी सांगितले.
पृथ्वीवर कोसळू शकणार्या संभाव्य उल्कांचा शोध घेण्यासाठी आणखी दहा वर्षे लागू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले, ही उल्का 15 ते 20 किलोमीटर प्रति सेकंद इतक्या प्रचंड वेगाने कोसळली आणि सुमारे पाच ते सहा सेकंद तिचा प्रकाश झळकला.