बंगळूर; पुढारी ऑनलाईन : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी अखेर राजीनामा दिला आहे. येडियुराप्पा यांनी आज सोमवारी आपला राजीनामा राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्याकडे सुपूर्द केला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
दरम्यान, जोपर्यंत नवीन मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेत नाही तोपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहावे, अशी सूचना राज्यपालांनी येडियुराप्पा यांच्याकडे केली.
बंगळूर येथील राजभवनवर जाण्यापूर्वी येडियुराप्पांनी आपण राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. विशेष म्हणजे त्यांच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात येडियुराप्पा यांनी मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होत असल्याचे जाहीर केले.
राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्यानंतर येडियुराप्पांनी लगेच बंगळूर येथील राजभवनवर राज्यपालांची भेट घेतली. आणि राजीनामा सुपूर्द केला.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदासाठी आठजण इच्छूक आहेत. त्यात विश्वेश्वरा हेगडे कागेरी, बसनगौंडा पाटील यतनाळ आणि अरविंद बेल्लाड यांची नावे सर्वांधिक चर्चेत आहेत.
पक्षाचे वरिष्ठ जसा आदेश देतील, त्यानुसार माझी वाटचाल असणार आहे. असे सांगत मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी बदल निश्चित असल्याचे याआधीचे संकेत दिले होते. त्यामुळे त्यांनी आंदोलने करू नका, पक्षादेश मान्य असेल, असेही आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते.
गेल्या दोन आठवड्यांपासून कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा सुरु आहेत. पक्षाचे अध्यक्ष जी सूचना करतील, ती पालन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे येडियुराप्पा यांनी सांगितले होते.
येडियुराप्पांच्या या निर्णयामुळे त्यांच्या समर्थक मंत्र्यांत चलबिचल सुरू आहे. येडियुराप्पा मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले, तर आमचे मंत्रिपदही जाऊ शकते. ते फार काळ टिकणार नाही, अशी भीती त्यांना सतावत आहे. त्यामुळे सरकारमध्ये चलबिचल दिसून येत आहे.