निपाणी; पुढारी वृत्तसेवा : सौंदलगा हद्दीत मांगुर फाट्यानजीक पुणे- बंगळूर महामार्ग अखेर पाचव्या दिवशी सोमवारी वाहतुकीस खुला झाला. यामध्ये प्रशासनानेही सकाळी पहिल्या टप्प्यात कोगनोळी ते निपाणी या दिशेने एकेरी वाहतूक सुरू केली.
दरम्यान सायंकाळी पाचच्या सुमारास निपाणी पोलीस प्रशासनाने कागल व कोल्हापूर पोलीस प्रशासनाशी चर्चा करून अखेर दुतर्फा आंतरराज्य वाहतुकीला परवानगी दिली.
त्यानुसार अखेर पाचव्या दिवशी पूर्ण क्षमतेने आंतरराज्य वाहतूक सुरू झाली आहे. तब्बल 116 तास थांबलेला बंगळूर पुणे महामार्ग खुला झाल्याने अडकून पडलेल्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे. चार दिवस थांबून असल्याने महामार्गावर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सहाजिकच पोलीस प्रशासनावर ताण पडला आहे.
अधिक वाचा –
मुसळधार पावसामुळे वेदगंगा व दुधगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याने बुधवारी मध्यरात्री महापुराने पुणे बंगळूर महामार्ग व्यापून टाकला होता.
यामध्ये महामार्गावर वेदगंगा नदी टापूत सौंदलगा हद्दीत मांगुर फाट्यानजीक तब्बल 12 फूट पाणी महामार्गावरून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत होते. त्यामुळे महामार्ग बुधवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आला होता. चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर सोमवारी सकाळी पाणी झपाट्याने ओसरले.
लागलीच रस्ते देखभाल जय हिंद कंपनीच्या सोमवारी 20 कर्मचाऱ्यांनी वेदगंगा नदीपुल ते मांगुर फाट्यापर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतरापर्यंत महामार्गावर पुराच्या पाण्यातून वाहून आलेला कचरा बाजूला करून रस्त्याची स्वच्छता करून महामार्ग एकेरी वाहतुकीसाठी मोकळा करून दिला.
अधिक वाचा –
सकाळी 10 वाजता निपाणी पोलीस प्रशासन व एनएचएआय नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया रस्ते बांधकाम अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पूर घटनास्थळाची महामार्गावरील रस्त्याची पाहणी केली.
त्यानंतर 11 वाजता पहिल्या टप्प्यात महामार्गावरून कोगनोळी ते बंगलोरच्या दिशेने तर सायंकाळी पाचच्या सुमारास बंगलोरहून पुण्याच्या तसेच मुंबईहून बंगलोरच्या दिशेने दुतर्फा वाहतूक खुली केली.
अधिक वाचा –
बुधवारी मध्यरात्री महामार्गावर पाणी आल्यानंतर घटनास्थळी चिक्कोडी विभागाचे पोलीस अधीक्षक मनोजकुमार नायक, निपाणीचे सीपीआय संगमेश शिवयोगी, उपनिरीक्षक अनिलकुमार उपनिरीक्षीका कृष्णवेनी गुर्लहोसूर, महामार्ग रस्ते देखभाल जयहिंद कंपनीचे निरीक्षक चैतन्य शिंदे, भरारी पथकाचे 20 तर 50 पोलीस कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने यमगरणी नदी पूल ते मांगुर फाटा या टापूत पाच दिवस खडा पहारा ठेवून आपली जबाबदारी पार पाडून सुरक्षितता मिळवून दिली.
या काळात जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबर्गी,जिल्हाधिकारी एम.जी.हिरेमठ यांनीही भेट देऊन परिस्थितीची माहिती जाणून घेऊन या ठिकाणी कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणेचे कौतुक करुन अभिनंदन केले.
अधिक वाचा –
पाहा व्हिडिओ – पूरग्रस्तांना बोटींमार्फत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा | Flood Rescue Operation