

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: टोकियो ऑलिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंना तिरंगा घेवून चालतांना बघून संपूर्ण देश रोमांचित झाला. त्याचक्षणी देशाने एकत्रितरित्या खेळाडूरूपी योद्धांना 'विजयी भव!' चा आर्शिवाद दिला, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमातून ऑलिंपिक मधील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव, कारगिल विजयी दिवस तसेच शेतीसंबंधी देशवासियांना संबोधित केले.
अधिक वाचा
पंतप्रधान म्हणाले की, ऑलिंपिकमध्ये गेलेले खेळाडू आयुष्यातील अनेक आव्हानांनंतर मात करीत इथपर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे ऑलिंपिक खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी समाज माध्यमांवर हॅशटॅग हमारा व्हिक्टरी पंच कॅम्पेन सुरू करण्यात आले आहे.
या अभियानात सर्वांनी त्यांच्या टीम सोबत व्हिक्टरी पंच शेअर करीत भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
देशासाठी जो तिरंगा हातात घेतो, त्याच्या सन्मानार्थ आपल्या भावना अभिमानाने उचंबळून येणे स्वाभाविक आहे. देशभक्तीची हीच भावना आपल्या सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवते.
२६ जुलै रोजी 'कारगिल विजय दिवस' आहे. कारगिलचे युद्ध भारतीय सैन्याच्या शौर्य आणि संयमाचे प्रतीक संपूर्ण जगाने पहिले आहे.
कारगिल युद्धाची रोमांचकारी कथा वाचण्याचे तसेच कारगिलच्या योद्ध्यांना वंदन करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी देशवासियांना केले.
अधिक वाचा
यंदा १५ ऑगस्ट रोजी देश आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करत आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सुरुवात १२ मार्चपासून महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमातून करण्यात आली होती. याच दिवशी, बापूंच्या दांडी यात्रेचे पुनरुज्जीवन करण्यात आले होते.
तेव्हापासून, जम्मू-काश्मीरपासून ते पुडदूचेरीपर्यंत, गुजरातपासून ते ईशान्येकडील राज्यांपर्यंत अमृत महोत्सवासही संबंधित कार्यक्रम होत आहेत.
यंदाच्या १५ ऑगस्टलाही असेच एक आयोजन होणार आहे. हा एक प्रयत्न आहे- राष्ट्रगीताशी संबंधित. सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रयत्न आहे की त्या दिवशी, जास्तीत जास्त भारतीयांनी एकाच वेळी राष्ट्रगीत गायचे.
यासाठी राष्ट्रगानडॉटइन हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या मदतीने राष्ट्रगीत गाऊन ते ध्वनिमुद्रित करता येईल, असे पंतप्रधान म्हणाले.
"अमृत महोत्सव' हा कुठल्या सरकारचा कार्यक्रम नाही, तर हा कोट्यवधी भारतवासियांचा कार्यक्रम आहे. प्रत्येक स्वतंत्र आणि कृतज्ञ भारतीयाने आपल्या स्वातंत्र्यसैनिकांना केलेले हे वंदन आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
या महोत्सवाच्या मूळ भावनेचा विस्तार बराच मोठा आहे. देशाच्या विकासासाठी एकत्र येणे, देशासाठी जगने तसेच देशासाठी प्रत्येकाला काम करायचे आहे.
या प्रवासात अगदी छोटीछोटी कामेदेखील मोठा प्रभाव पाडू शकतात.
दैनंदिन कामे करतांनाही आपण राष्ट्र निर्मितीचे काम करु शकतो, असे पंतप्रधान म्हणाले.
अधिक वाचा
देशातील स्थानिक उद्योजक, कलाकार, शिल्पकार, विणकर यांना आधार देणे, हे आपल्या रोजच्या सवयीचा भाग असावा.
७ ऑगस्ट रोजी 'राष्ट्रीय हातमाग दिवस' आहे. याच दिवशी, १९०५ साली स्वदेशी आंदोलनाची सुरुवात झाली होती.
आपल्या देशातील ग्रामीण आणि आदिवासी भागात, हातमाग, उत्पन्नाचे एक महत्त्वाचे साधन आहे. हे एक असे क्षेत्र आहे ज्याच्याशी लाखों महिला, लाखो विणकर, लाखो शिल्पकार जोडलेले आहेत.
आपले छोटेछोटे प्रयत्न, वीणकरांमध्ये एक नवी उमेद जागवू शकतात. अशात देशवासियांनी हातमाग उद्योगाची किमान एक वस्तू खरेदी करीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना आपली जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.
आदिवासी समुदायात बोरे खूप लोकप्रिय आहेत. आदिवासी समुदायाचे लोक नेहमीच बोरांची शेती करतात. पंरतु, कोरोना महारोगराईनंतर याची शेती विशेष वाढली आहे.
त्रिपुराच्या उनाकोटी येथील विक्रमजीत चकमा यांनी बोरांची लागवड करून खूप नफा कमावला आणि आता ते लोकांना बोरांचे पीक घेण्यासाठी प्रेरित करीत आहेत.
शेतीमध्ये संशोधन होत आहे, तर शेतीच्या इतर दुय्यम उत्पादनांमध्ये देखील सर्जनशीलता पाहायला मिळत आहे.
कोरोना काळात लखीमपुर-खिरीतील महिलांना केळ्याच्या तणांपासून फायबर बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू करण्यात आले.
केळ्यांचे तण कापून मशीनच्या मदतीने हे फायबर तयार केले जाते, जे ज्यूट प्रमाणे असते. या फायबरपासून हॅन्ड बॅग, सतरंजी असे कितीतरी वस्तू बनवल्या जातात, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले .
पावसाळा केवळ सुंदर आणि आनंददायी नाही, तर पोषण देणारा, जीवन देणारा देखील असतो.
पावसाचे पाणी जे आपल्याला मिळत आहे ते आपल्या भावी पिढ्यांसाठी आहे हे आपण कधीही विसरू नये, असे स्पष्ट करत पंतप्रधानांनी जलसंचयाचा संदेश देशवासियांना दिला.
हेही वाचलं का ?