Hijab Controversy : कर्नाटकात नवा वाद, सरकारी महाविद्यालयांत मुलींना हिजाब घालण्यास मनाई | पुढारी

Hijab Controversy : कर्नाटकात नवा वाद, सरकारी महाविद्यालयांत मुलींना हिजाब घालण्यास मनाई

हुबळी; पुढारी ऑनलाईन डेस्क

कर्नाटकात मुलींनी हिजाब (Hijab) घालण्यावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकातील एका महाविद्यालयाने मुलींना वर्गात हिजाब घालण्यास मनाई केली आहे. शिमोगा जिल्ह्यातील भद्रावती शहरातील एका सरकारी महाविद्यालयाने हा निर्णय घेतला आहे. विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या वेटिंग रूममध्ये हिजाब काढून त्यानंतर वर्गात प्रवेश करावा, असे महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

भद्रावती येथील विश्वेश्वरय्या सरकारी महाविद्यालयाचे प्राचार्य एमजी उमाशंकर यांनी म्हटले आहे की, हिजाबच्या मुद्यावर विद्यार्थिनी आणि पालकांशी चर्चा केली आहे. या मुद्यावर तोडगा काढण्यात आला आहे. यामुळे मुली आता वर्गात हिजाब घालणार नाहीत.
याआधी विद्यार्थ्यांचा एक गट भगवा स्कार्फ घालून महाविद्यालयात आला आणि त्यांनी त्यांच्या मुस्लिम वर्गमैत्रिणींना वर्गात हिजाब घालू नये असे सांगितले होते. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने विद्यार्थिनींना वर्गात हिजाब घालण्यास मनाई केली. कर्नाटकातील सरकारी महाविद्यालयांमध्ये एकसमान ड्रेस-कोड आहे.

Hijab Controversy : नेमका वाद काय आहे?

याआधी चिक्कमंगळूर येथील महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी केशरी शाल परिधान करून कॅम्पसमध्ये मुस्लिम मुली हिजाब परिधान करत असल्याबद्दल निषेध नोंदवला होता. त्यानंतर शिमोगा जिल्ह्यातील सरकारी महाविद्यालयात हिजाबवरुन वाद निर्माण झाला होता. याआधी कुंदनपूर येथील महाविद्यालयात हिजाबला विरोध झाला होता. तसेच उडुपी जिल्ह्यातील प्री-यूनिवर्सिटीच्या महाविद्यालयात ७ विद्यार्थिनींना हिजाब घातल्याबद्दल वर्गात प्रवेश दिला नव्हता. समान ड्रेस कोडच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे महाविद्यालय प्रशासनाने म्हटले होते. हायकोर्टात दाखल केलेल्या एका याचिकेत विद्यार्थिनींनी म्हटले आहे की, त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे कलम १४ आणि २५ अंतर्गत त्यांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भारताची नवीन येणारी Virtual – Digital currency नेमकी आहे तरी कशी?

Back to top button