पुढारी ऑनलाईन डेस्क
फेसबुकवरील आभासी जग (virtual reality) मेटाव्हर्सचे (metaverse) अनेक लोकांना वेध लागले आहे. मेटाव्हर्सवर अभिनेते, अभिनेत्री आणि अन्य लोक सहभागी होऊ लागले आहेत. पण याच दरम्यान एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. एका महिलेने फेसबुकवरील मेटाव्हर्सवर प्रवेश करताच त्यांच्यावर गँगरेप झाल्याचा दावा केला आहे.
लंडनमधील एका ४३ वर्षीय महिलेने मेटाव्हर्समध्ये लॉग इन केले आणि त्यांनी त्यांचा अवतार तयार केला. पण काही क्षणात जे काही घडले त्याचा अनुभव त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून शेअर केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आभासी जगात दाखल झाल्यानंतर ६० सेकंदाच्या आत मेटाव्हर्सवर तीन ते चार पुरुष अवतारांनी आपल्यावर हल्ला केला आणि लैंगिक छळ सुरु केला. हे खूप धक्कादायक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
"मेटाव्हर्सच्या आभासी जगात सहभागी झाल्याच्या ६० सेकंदाच्या आत ३ ते ४ पुरुष अवतारांनी माझा शाब्दिक आणि लैंगिक छळ केला. त्यांनी माझ्या अवताराचे लैंगिक शोषण केले आणि फोटो काढले. मी दूर जाण्याचा प्रयत्न केला असता ते ओरडले आणि म्हणाले 'तुम्हाला हे आवडत नाही असे भासवू नका'.
हा अनुभव खूप भयानक होता. हे सर्व इतक्या वेगाने घडले की काय करावे मला कळलेच नाही. हे वास्तवात घडत आहे की स्वप्नात हे काही समजत नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे.
मेटाव्हर्सवर (metaverse) 3D आभासी जग आहे. जेथे वास्तवातील जीवनाचे अनुकरण केले जाते. मेटाव्हर्सवर होलोग्राफिक अवतार आणि व्हिडिओ यांचा समावेश असतो. मेटाव्हर्स हा शब्द आता एक बझवर्ड आहे. जो नील स्टीफनसन्सच्या विज्ञान कथेवर आधारीत असलेल्या १९९२ मधील स्नो क्रॅश (Snow Crash) या कादंबरीत पहिल्यांदा वापरण्यात आला होता. त्यात आभासी जगात एकत्रित केलेल्या अवतारांची कल्पना केली होती.
मेटाव्हर्स अजूनही त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. फेसबुकने त्याची निर्मिती केली आहे. मेटाव्हर्स तयार करण्यासाठी मार्क झुकरबर्गने फेसबुकने मूळ कंपनीचे नाव बदलून मेटा केले आहे.
मेटाव्हर्स हे इंटरनेटच्या त्या टप्प्याचा विकास आहे; जिथे वास्तवाला आभासी स्वरूप दिले जाते. या आभासी जगात तुमचा आणि इतर अनेकांचा आभासी अवतार असेल किंवा प्रतिकृती असतील, ज्यांच्याशी तुम्ही ३D रुपात संवाद साधू शकता. पण, मेटाव्हर्सच्या या Augmented Reality च्या जगात एकमेकांना आभासी स्वरुपात भेटण्यासाठी, आपल्याकडे व्हीआर (Virtual Reality) हेडसेट असणे आवश्यक आहे. आज, जगातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या मेटाव्हर्समध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत.
हे ही वाचा :