Metaverse : आभासी दुनियेतील नवे पाऊल … लग्‍नानंतर रिसप्‍शन होणार ‘हॉगवार्ट किल्‍ल्‍यावर, वधुचे दिवंगत वडीलही होणार सहभागी! | पुढारी

Metaverse : आभासी दुनियेतील नवे पाऊल ... लग्‍नानंतर रिसप्‍शन होणार 'हॉगवार्ट किल्‍ल्‍यावर, वधुचे दिवंगत वडीलही होणार सहभागी!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क
लग्‍न असो की रिसप्‍शन आपल्‍याकडे वर्‍डाडी, वाजंत्री, पाहुण्‍यांची रेलचेल आणि एकच धावपळ. मात्र मागील दोन वर्षात कोरोना संकटाने लग्‍नातील धामधुमीला मर्यादा आल्‍या. कोरोनावर मात करण्‍यासाठी गर्दीला प्रतिबंध हाच उपाय आहे. त्‍यामुळे आता लग्‍न सोहळा साजरा करण्‍याच्‍या आपल्‍या कल्‍पना बदलत आहेत. आपल्‍या नातेवाईकांसह मित्रांनीही रिसप्‍शनमध्‍ये सहभागी व्‍हावे. यासाठी तामिळनाडूमधील के दिनेश एसपी व नागानंदिनी रामास्‍वामी यांनी फेसबुकच्‍या मेटाव्‍हर्सवर (  Metaverse ) आभासी ( व्हर्च्युअल ) रिसप्‍शन करण्‍याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्‍हणजे वधू आणि वर हे हॅरी पॉटरचे ‘डाय हार्ड’ फॅन आहेत. त्‍यामुळे लग्‍नानंतर होणार्‍या आभासी ( व्हर्च्युअल ) रिसप्‍शन हॉगवार्ट किल्‍ल्‍यावर ठेवलं आहे! एवढं समजून घेतल्‍यानंतर आपण मेटाव्‍हर्सवर होणार्‍या भारतातील पहिल्‍या आभासी जगतामधील रिसप्‍शनची माहिती घेवूया…

‘मेटाव्‍हर्स’ (  Metaverse ) ही थ्रीडी डिजिटल दुनिया आहे. येथे व्हर्च्युअल रिएलिटीव्‍दारे एक आभासी जग उभारले जाते. सारं काही कम्‍प्‍युटरने निर्माण केलेले डिजिटल स्‍थळ असेल. यामध्‍ये सारे जण आभासी ( व्हर्च्युअल ) रुपातच सहभागी होतील. विशेष म्‍हणजे या रिसप्‍शनमध्‍ये वधूचे दिवंगत वडीलही सहभागी होती. फोटोच्‍या आधारे त्‍यांचे डिजिटल रुप साकारले जाईल.

दिनेश एसपी व नागानंदिनी रारास्‍वामी हे लहानपणापासून हॅरीपॉटरचे फॅन आहेत. त्‍यामुळे मेटाव्‍हर्सवर होणारे रिसप्‍शनसाठी हॉगवार्ट किल्‍ला हे स्‍थळ निवडलं आहे. आत रिसप्‍शन  आभासी असल्‍याने वर-वधूंना गर्दी टाळता येईल. अशा पद्‍धतीचे हे भारतातील पहिले रिसप्‍शन असल्‍याने याची मोठी चर्चा सध्‍या तामिळनाडूमध्‍ये सुरु आहे.

दिनेश एसपी आणि नागानंदिनी कृष्‍णागिरीमधील शिवलिंगपुरममध्‍ये ६ फेब्रुवारी राेजी विवाहबद्‍द्‍ होतील. यानंतर रिसेप्‍शनमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी पाहुण्‍यांना लिंक आणि पासवर्ड दिले जातील. ते रिसप्‍शनमध्‍ये डिजिटल रुपात सहभागी होतील. यानंतर आभासी जगात सर्व एकमेकांना भेटतील. भेटवस्‍तूही डिजिटल गुगल पे सारख्‍या ॲपच्‍या माध्‍यमातून दिल्‍या जातील. मात्र जेवणाची सोय असणार नाही. त्‍यामुळे या रिसप्‍शनमध्‍ये सहभागी होणारे खवय्‍ये निश्‍चित हिरमुसतील.

 Metaverse : कोराना महामारीमुळे ‘आभासी’ रिसप्‍शनचा विचार

दिनेश एसपी हा क्रिप्‍टोकरंसीचे काम करणार्‍या आयआयटी मद्रासमधील एका प्रोजेक्‍टमध्‍ये काम करतो. तर नागानंदिनी ही सॉप्‍टवेअर इंजिनिअर आहे. या दोघांची पहिली भेट इंस्‍टाग्रामवर झाली. यानंतर दोघांनी लग्‍नगाठ बांधण्‍याचा निर्णय घेतला. मात्र कोरोनामुळे विवाह सोहळ्यावर निर्बंध आले. यामुळे त्‍यांनी कुटुंबीयांच्‍या उपस्‍थितीत लग्‍न पार पडल्‍यानंतर आभासी रिसप्‍शनची कंपना मांडली. ॲप डेव्‍हलपर क्‍वाटिक्‍स टेक कंपनीच्‍या विग्‍नेश सेल्‍वाराज यांच्‍याशी चर्चा केली. यांनी या आभासी ( व्हर्च्युअल ) रिसप्‍शनची  तयारी पूर्ण केली आहे.

अमेरिकेत ‘मेटाव्‍हर्स’ विवाहाला नाही कायदेशीर मान्‍यता

मागील वर्षी अमेरिकेतील ट्रसी आणि डेव यांनी ‘मेटाव्‍हर्स’च्‍या माध्‍यामतून लग्‍न केले होते. अमेरिकेतील ते पहिले आभासी लग्‍न ठरलं. मात्र अमेरिकेतील अनेक राज्‍यांमध्‍ये अशा लग्‍नाला कायदेशीर मान्‍यता देण्‍यात आलेली नाही. येथील कायदानुसार इंटरनेटच्‍या माध्‍यमाने केलेले विवाहाची कायदेशीर नोंद केली जात नाही.

मेटाव्‍हर्स नेमकं कसे काम करेल?

फेसबुकचे नाव यापुढे मेटा असेल, अशी घोषणा कंपनीचे प्रमुख झुकेरबर्ग यांनी मागील वर्षी केली होती. मेटा नावासोबत युनिव्‍हर्स (विश्‍व) मधील व्‍हर्स जोडून मेटाव्‍हर्स नावाचं वेगळं विश्‍व निर्माण करण्‍याचा कंपनीचा मानस आहे. तसेच यासाठी हेडसेटचीही निर्मितीही सुरुआहे.

मेटाव्‍हर्स ही एक आभासी दुनिया आहे. यामध्‍ये व्‍यक्‍ती आभासी ( व्हर्च्युअल ) रुपात असणार आहे. वापरकर्ता हा स्‍वत:च्‍याच आभासी रुपाला भेटेल. तसेच अन्‍य वस्‍तूही वा ठिकाणे आभासी स्‍वरुपात पाहू शकेल. हे इंटरनेटचे भविष्‍य असल्‍याने मेटाव्‍हर्सचे वापरकर्ते हे एक अब्‍जाहून अधिक असतील, असा विश्‍वास झुकेरबर्ग यांनी व्‍यक्‍त केला आहे. आभासी जगामुळे निर्माण होणार्‍या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिणामांवरही चर्चा सुरु आहे.

मेटाव्‍हर्समध्‍ये वापरकर्ते हे डिजिटल रुपात असतील. झुकेरबर्ग म्‍हणतात, मेटाव्‍हर्स हे इंटरनेटचे भविष्‍य आहे. त्‍यामुळे यामध्‍ये गुंतवणूक करण्‍यासाठी अनेक बड्या कंपन्‍या सरसावल्‍या आहेत. सध्‍या तरी मेटाव्‍हर्स संदर्भात अनेक कल्‍पना मांडल्‍या जात आहेत. मात्र भारतात हाेणार्‍या आभासी रिसप्‍शेनमुळे या नव्‍या आभासी विश्‍वाबद्‍दलचे सर्वसामान्‍यांमधील कुतूहल अधिक वाढले आहे.

हेही वाचलं का? 

पाहा व्‍हिडीओ :

 

 

Back to top button