Dhule Crime : प्रेमसंबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून, उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर संशयित आराेपींवर गुन्‍हा दाखल - पुढारी

Dhule Crime : प्रेमसंबंधाच्या संशयावरून तरुणाचा खून, उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानंतर संशयित आराेपींवर गुन्‍हा दाखल

धुळे ; पुढारी वृत्तसेवा : प्रेमसंबंधाच्‍या संशयावरून तरुणाचा शेततळ्यात बुडवून खून केल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्‍या आदेशानंतर शिंदखेडा पोलीस ठाण्यात पाच संशयित आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Dhule Crime)

शिंदखेडा तालुक्यातील वरुड येथे राहणारे सागर प्रकाश मराठे (वय २६) यांचा मृतदेह चौगाव शिवारातील रावबा धनगर यांच्या शेतात असलेल्या शेततळ्यात आढळून आला हाेता . यासंदर्भात शिंदखेडा पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेनंतर  सागर याची आई लताबाई प्रकाश मराठे यांनी, सागरचा खून झाल्‍याची तक्रार दिली हाेती. संशयित आराेपींवर खुनाचा गुन्हा दाखल न झाल्याने त्‍यांनी उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली हाेती.

Dhule Crime : यापुर्वी एकवेळ मारहाण

तक्रारीत मराठे यांनी गंभीर आरोप केले.एका मुलीबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून सागरला मारहाण झाली होती. त्याचप्रमाणे संबंधित आरोपी यांनी घरी जाऊन त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. यावेळी गावातील तसेच नजीकच्या नातेवाईकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण आपसात मिटवले. मात्र त्यानंतर हा राग कायम ठेवून सागर याला शेततळ्यामध्ये बुडवून ठार मारल्याचा संशय या तक्रारींमध्ये व्यक्त करण्यात आला. त्यानुसार न्यायालयाने यासंदर्भात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले. यासंदर्भात आता गट्टू सरदार मराठे, दिलीप भाऊराव कोळी ,संजय दगा सैंदाणे, भुरमल मंगल भील, सोनू पाटील यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील भाबड  तपास करीत आहेत.

हेही वाचलं का?  

Back to top button