ओशियनोग्राफी : चाकोरीबाहेरची वाट धरू इच्छिणार्‍यांसाठी नक्‍कीच फायदेशीर | पुढारी

ओशियनोग्राफी : चाकोरीबाहेरची वाट धरू इच्छिणार्‍यांसाठी नक्‍कीच फायदेशीर

डॉक्टर, इंजिनिअर यासारख्या करिअरच्या पारंपरिक पायवाटा चोखाळण्याऐवजी चाकोरीबाहेरची वाट धरू इच्छिणार्‍यांसाठी ओशियनोग्राफीचं क्षेत्र नक्‍कीच फायदेशीर ठरू शकेल. ओशियनोग्राफी मध्ये समुद्राशी निगडित विविध बाबींचा सखोल अभ्यास केला जातो.

सागरातील जीवसृष्टीबद्दल मानवाला नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. कदाचित म्हणूनच समुद्र आणि त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास करणे मानवासाठी नेहमीच आव्हान ठरले आहे. ओशियनोग्राफी या शाखेत समुद्रसंबंधीच्या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला जातो. समुद्र आणि त्यासंबंधीच्या वेगवेगळ्या विषयांची आवड असणार्‍यांसाठी या क्षेत्रातली कोणतीही उपशाखा निवडून करिअरची वेगळी वाट नक्‍कीच चोखाळता येईल. ओशियनोग्राफीच्या काही प्रमुख उपशाखा आहेत.

केमिकल ओशियनोग्राफी – या उपशाखेचा संबंध पाणी, पाण्यातील क्षार, रसायने, पाण्याचा दर्जा इत्यादी गोष्टींशी असतो. केमिकल ओशियनोग्राफीचे जॉब प्रोफाईल समुद्राशी निगडीत रासायनिक घडामोडी, रासायनिक कंपाऊंड यांच्याभोवती फिरत असते. येथेे समुद्रातील मौल्यवान तत्त्वे मिळवण्यासाठी काही तंत्र विकसित करणे, समुद्रातील रासायनिक प्रक्रियांच्या साहाय्याने किंवा त्यातील काही रासायनिक घटकांच्या साहाय्याने मानवापयोगी घटक विकसित करणे हे प्रमुख उद्दिष्ट असते.

जिऑलॉजी – या शाखेमध्ये समुद्राचा आकार, त्यातील घटकांचे प्रकार जाणणे, किनार्‍यावरील स्तरांचा अभ्यास करणे, समुद्राच्या पोटात असणार्‍या उंच, सखल भागाचा अभ्यास करणे. थोडक्यात समुद्राच्या जिऑलॉजिकल आणि जियोफिजिकल वैशिष्ठ्यांचा अभ्यास करणे या शाखेत अंतर्भूत असते.

फिजिकल ओशियनोग्राफी – या शाखेंतर्गत महासागरातील तापमान, घनता, वेग, गती, इत्यादी गोष्टींचे संशोधन केले जाते. या घडामोडींच्या मागे असणार्‍या कारणांपर्यंत पोहोचायचे असते. येथे अभ्यासकाला समुद्र, जलवस्तू, ऋतू, हवामान यांच्यातील परस्पर संबंधाबद्दल अभ्यास करायचा असतो.

मरिन बायोलॉजी या शाखेमध्ये समुद्राच्या वातावरणात, समुद्राच्या पाण्यात राहणार्‍या जीवन चक्रावर संशोधन करायचे असते. एक मरिन बायोलॉजिस्ट (समुद्र जीवशास्त्रतज्ज्ञ) समुद्र जीवांची निर्मिती प्रक्रिया कोण थांबवते, ती कशी सुरू असते याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो.

मरिन ऑर्कियोलॉजिस्ट या शाखेमध्ये समुद्राच्या पोटात दडलेल्या एखाद्या ऐतिहासिक संस्कृतीचा शोध घेणे, ज्यामध्ये एखादी इमारत, हत्यारे, भांडी, त्यांच्या काळातील राहाणीमानाशी निगडीत सामान बाहेर काढणे, त्यावर संशोधन करणे यांचा अभ्यास केला जातो. या संशोधनामुळे काळाच्या आड दडलेल्या संस्कृतीचा शोध लागण्यास मदत होते.

ओशियनोग्राफीच्या क्षेत्रात पदवी मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या सरकारी, खासगी संस्थांमध्ये शास्त्रज्ञ, इंजिनिअर, टेक्निशियन या पदांसाठी नेहमीच चांगली मागणी असल्याचे दिसते. सर्व्हे ऑफ इंडिया आणि डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रीशी जोडलेल्या कंपन्यादेखील या क्षेत्रात बर्‍याच संधी उपलब्ध करत असतात.

ओशियनोग्राफीचा अभ्यासक्रम राबवणार्‍या देशांतील काही प्रमुख संस्था आहेत. यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट स्टडीज, नवी दिल्ली, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनोग्राफी गोवा विश्‍वविद्यालय गोवा, उत्कल विश्‍वविद्यालय भुवनेश्‍वर, ओरिसा, युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास, चेन्‍नई, कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी कोचीन, मंगलोर युनिव्हर्सिटी, कर्नाटक यांचा समावेश आहे.

Back to top button