उत्तरप्रदेश निवडणूक : भाजपला आणखी एक झटका; मंत्री दारा सिंह चौहान सपामध्ये दाखल - पुढारी

उत्तरप्रदेश निवडणूक : भाजपला आणखी एक झटका; मंत्री दारा सिंह चौहान सपामध्ये दाखल

लखनऊ; पुढारी ऑनलाईन 

देशातील पाच राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभुमीवर उत्तर प्रदेशसह इतर राज्यांतील अनेक भाजप मंत्री व नेते पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये आत्तापर्यंत जवळपास १३ भाजप नेत्यांनी राजीनामा देत पक्षाला धक्का दिला आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर योगी सरकारमध्ये मंत्री राहिलेले दारा सिंह चौहान यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात आपल्या समर्थकांसह प्रवेश केला. सपामध्ये पक्षात प्रवेश केल्यानंतर चौहान यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सबका साथ सबका विकास असा नारा देऊन भाजप सरकार स्थापन झाले. मात्र काही निवडक लोकांसाठीच विकास झाला, असेही ते म्हणाले.

दारा सिंह चौहान यांनी यापूर्वी सरकारचा राजीनामा दिला होता. राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात दारा सिंह यांनी लिहिले होते की, मी माझ्या विभागाच्या भल्यासाठी मनापासून काम केले, परंतु योगी सरकारच्या काळात मागास, वंचित, दलित, शेतकरी आणि बेरोजगार तरुण यांच्याकडे घोर दुर्लक्ष करण्याबरोबरच मागासवर्गीय आणि दलितांच्या आरक्षणाबाबत होत असलेल्या गोंधळामुळे मी उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा देत आहे.

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चौहान यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. दारा सिंह समाजवादी पक्षात प्रवेश करतील अशी अटकळ होती.

हेही वाचा

Back to top button