ऑस्ट्रेलियन मॉडेलवर ओमायक्रॉन व्हायरसचा असाही साइड इफेक्ट | पुढारी

ऑस्ट्रेलियन मॉडेलवर ओमायक्रॉन व्हायरसचा असाही साइड इफेक्ट

मेलबोर्न : सध्या जगातील समस्त देशांना हतबल करून सोडलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनच्या लक्षणांबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे दावे करण्यात येत आहेत. याच दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मॉडेलने केलेला दावा आश्चर्यकारक वाटणारा आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर आपल्याला वारंवार आणि कडकडून भूक लागते आणि त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नसल्याचे तिने म्हटले आहे.
मेलबोर्न शहरात राहणार्‍या अ‍ॅलेक्झांड्रा डफिन या व्यवसायाने मॉडेल असलेल्या तरुणीला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता. सध्या ती यातून सावरली आहे. मात्र, तिला सध्या एकसारखे काही ना काही तरी खावे असे वाटत असते. यासंदर्भात डफिन म्हणते की, ओमायक्रॉनची बाधा झाल्यानंतर मी माझ्या जेवणावरील नियंत्रण गमावून बसले होते.

तत्पूर्वी डफिनला डेल्टा व्हेरिएंटचाही संसर्ग झाला होता. त्यावेळी ती व्यवस्थितपणे खाऊ-पिऊ शकत नव्हती. त्यामुळे तिचे वजन घटले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या जानेवारीत ती ओमायक्रॉनच्या विळख्यात सापडली. यावेळी मात्र तिची परिस्थिती पूर्णपणे बदलली. कितीही प्रबळ इच्छा असली तरी सध्या आपल्या खाण्या-पिण्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. यामुळे तिचे वजन झपाट्याने वाढू लागले आहे.

डफिनने दिलेल्या माहितीनुसार, तिने 3 जानेवारीला डोस घेतला होता. त्यानंतर ती ओमायक्रॉनच्या विळख्यात सापडली. यामुळे तिला आता दर पाच मिनिटांनी काही ना काही तरी खावे असे वाटते. मिठाई, आइस्क्रीम अथवा पॉपकॉर्न कायम खातच असते.

Back to top button