Dara Singh Chauhan : यूपीत भाजपला २४ तासांत दुसरा धक्का, आणखी एका मंत्र्यानं केला योगी सरकारला रामराम - पुढारी

Dara Singh Chauhan : यूपीत भाजपला २४ तासांत दुसरा धक्का, आणखी एका मंत्र्यानं केला योगी सरकारला रामराम

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला आणखी धक्‍का बसला आहे. भाजपचे श्रम मंत्री स्‍वामी प्रसाद मौर्य ( Swami Prasad Maurya) यांनी राजीनामा देऊन समाजवादी पार्टीत प्रवेश केला होता. आता आणखी एक मंत्री दारा सिंह चौहान (Dara Singh Chauhan) यांनी योगी सरकारला रामराम केला आहे. २४ तासांत भाजपसाठी हा दुसरा धक्का आहे. दारा सिंह चौहान समाजवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.

राजकीयदृष्टी देशातील सर्वांत महत्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. दोन दिवसांत दोन मंत्री आणि चार आमदारांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. यामुळे राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारला अखिलेश यादव यांच्याकडून कडवे आव्हान मिळत आहे.

Image

आपल्या राजीनामा पत्रात वन आणि पर्यावरण मंत्री चौहान ( Dara Singh Chauhan) यांनी लिहिले आहे, ”मी पूर्ण समर्पणाने काम केले, पण वंचित वर्ग, किसान आणि बेरोजगार युवक तसेच ओबीसी आरक्षणाबाबत सरकारची भूमिका उपेक्षापूर्ण राहिली आहे. यामुळे मी राजीनामा देत आहे.”

 

काल मंगळवारी स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनी पुन्हा भाजपमध्ये परत फिरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी भाजपला सोडलं आहे. पुन्हा परत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही मौर्य यांनी म्हटले आहे.

राजीनामा दिल्‍यानंतर माध्‍यमांशी संवाद साधताना स्‍वामी प्रसाद मौर्य ( Swami Prasad Maurya ) यांनी सांगितले की, माझे व्‍यक्‍तिगत कोणीशीही शत्रुत्‍व नाही. सामाजिक न्‍यायासाठी मी सातत्‍याने संघर्ष केला आहे. यापुढेही करत राहणार आहे. सध्‍या तरी उत्तर प्रदेशमध्‍ये सामाजिक न्‍याय मिळताना दिसत नाही. त्‍यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

राजीनामा दिल्‍यानंतर मौर्य यांनी याची माहिती सोशल मीडियावरही दिली. त्‍यांनी फेसबुक पोस्‍टमध्‍ये नमूद केलं आहे की, उत्तर प्रदेशमधील दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार तरुण आणि लघू व मध्‍यम उद्‍योजक उपेक्षित राहिले आहेत. त्‍यामुळे मी योगी मंत्रीमंडळातून राजीनामा देत आहे. आणखी १० ते १२ आमदार राजीनामा देतील. पुढील एक ते दोन दिवसांमध्‍ये पुढील रणनीती स्‍पष्‍ट करण्‍यात येईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हे ही वाचा :

 

Back to top button