विधानसभा निवडणूक : यूपी, उत्तराखंड, गोव्यात भाजपला आघाडी - पुढारी

विधानसभा निवडणूक : यूपी, उत्तराखंड, गोव्यात भाजपला आघाडी

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या राज्यांत विधानसभा निवडणुकांची तयारी पूर्ण झाली आहे. विधानसभा निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर एबीपी न्यूजच्या ‘एबीपी सी वोटर ओपिनियन पोल’ने पाचही राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून, त्यानुसार उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होईल, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सर्व्हेनुसार उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्येही भाजपला आघाडी मिळणार आहे. पंजाबात आम आदमी पक्ष मुसंडी घेईल, असे भाकीत या सर्व्हेतून वर्तविण्यात आले आहे.

6 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात झालेल्या सर्व्हेत 49 टक्के लोकांनी भाजपच्या बाजूने कौल दिला आहे. समाजवादी पक्षाचे सरकार येईल, असे मत 30 टक्के लोकांनी व्यक्‍त केले. बसपच्या बाजूने केवळ 7 टक्के लोकांनी कौल दिला. 3 जानेवारीला झालेल्या सर्व्हेनुसार, मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ हे 44 टक्के लोकांची पसंती होते, तर या पदावर अखिलेश यांना 32 टक्के, तर मायावती यांना 15 टक्के लोकांनी पसंती दिली.

पंजाबमध्ये ‘आप’ आघाडीवर

पंजाबातील ‘सी व्होटर’ सर्व्हेनुसार, 32 टक्के लोकांना आम आदमी पक्षाचे सरकार राज्यात हवे आहे. काँग्रेसच्या बाजूने 27 टक्के लोकांचा कौल होता. अकाली दल आणि बसप युतीच्या बाजूला 11 टक्के लोक होते. पंजाब सरकारवर तुम्ही नाराज आहात काय, या प्रश्‍नाला 66 टक्के लोकांनी होकारार्थी उत्तर दिले. सरकारवर आम्ही नाराजही नाही आणि ते आम्हाला बदलयाचेही नाही, असे 34 टक्के लोकांचे म्हणणे होते.

उत्तराखंडमध्ये भाजप सरकार

उत्तराखंड राज्यात 40 टक्के लोक भाजपच्या बाजूने आहेत, असे या सर्व्हेतून दिसून आले. काँग्रेसच्या बाजूने 36 टक्के मतदारांचा कौल होता. आम आदमी पक्षाला 13 टक्के मतदारांची पसंती होती. अकरा टक्के मतदारांनी इतरांच्या बाजूने कौल दिला. सर्व्हेनुसार, भाजपला 33 ते 39 जागा मिळतील. काँग्रेसला 29 ते 35 जागा मिळतील. ‘आप’ला 1 ते 3 जागा मिळतील.

गोव्यात पुन्हा भाजप

गोव्यात विधानसभेच्या 40 जागा आहेत. सर्व्हेनुसार, भाजपला 32 टक्के मते मिळतील. काँग्रेसला 20 टक्के, तर ‘आप’ला 22 टक्के मते प्राप्‍त होतील. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष युतीला 8 टक्के, तर इतरांना 18 टक्के असा वाटा असेल. भाजपला 19 ते 23 जागा, काँग्रेसला 4 ते 8 जागा, ‘आप’ला 5 ते 9 जागा, तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष युतीला 2 ते 6 जागा मिळतील. इतरांच्या वाट्याला 0 ते 4 जागा येऊ शकतात.

मणिपूरमध्ये भाजप-काँग्रेस टक्‍कर

सर्व्हेनुसार, मणिपूरमध्ये विधानसभेचे 60 मतदारसंघ आहेत. भाजपला या राज्यात 35 टक्के, तर काँग्रेसला 33 टक्के मते मिळतील. ‘एनपीएफ’चा 11, इतरांचा 21 टक्के वाटा एकूण मतदानात असेल. भाजप 23 ते 27 जागांवर, काँग्रेस 22 ते 26 जागांवर विजयी होईल. ‘एनपीएफ’ला 2 ते 6 जागांवर समाधान मानावे लागेल. 5 ते 9 जागा इतरांना मिळतील.

पाच राज्यांतील या मोठ्या सर्व्हेत 89 हजारांहून अधिक लोकांची मते नोंदवली गेली. सर्व 690 विधानसभा मतदारसंघांतील लोकांची मते त्यात विचारात घेण्यात आली आहेत. 12 डिसेंबर ते 8 जानेवारीदरम्यान हा सर्व्हे घेण्यात आला.

Back to top button