

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देवळा तालुक्यातील खर्डे येथील शेतकरी अशोक भावराव गांगुर्डे यांनी मोठ्या आशेने पेरलेला मका पाण्याअभावी करपून गेल्याने अखेर त्यावर रोटर फिरवली आहे.
देवळा तालुक्यात यावर्षी वरून राजाने पाठ फिरविल्याने नदी-नाले, छोटे मोठे पाझर तलाव कोरडी ठाक पडली आहेत. यामुळे विहिरींनीही तळ गाठल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. तर खरिपाची पेरणी पूर्णतः वाया गेली असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. तालुक्यातील खर्डे येथील युवा शेतकरी अशोक भावराव गांगुर्डे यांनी जवळपास पाच एकर क्षेत्रावर मक्याची पेरणी केली असून, पाण्याअभावी संपूर्ण पीक करपून गेले आहे. यासाठी गांगुर्डे यांना जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये खर्च आला आहे. पेरलेला मका पाण्या अभावी वाढला नाही. संपूर्ण पेरणी केलेले मका पीक करपून गेल्याने खर्च देखील वसूल होणार नसल्याने गांगुर्डे यांनी त्यांनी त्यावर रोटर फिरवला आहे.
संबधित बातम्या :
आधीच कांद्यासह इतर शेतमालाला बाजार भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यात पावसाअभावी पिके करपून गेल्याने बळीराजा दुहेरी -तिहेरी संकटात सापडल्याने शासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गांगुर्डे यांनी केली आहे.
हेही वाचा :