

पुणे : क्लोरो-फ्लोरो कार्बनसह मानवनिर्मित हरितगृहवायूंच्या उत्सर्जनामुळे पृथ्वीभोवतालचा ओझोनचा थर कमी होत आहे. हा संरक्षक थरच कमी होत असल्याने तिचा रंग बदलत आहे. 2040 ते 2060 या कालावधीत पृथ्वीचा रंग पूर्ण बदलणार आहे, असा निष्कर्ष नासाच्या शास्त्रज्ञांनी काढला आहे. 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या या वायूच्या थराबाबत शास्त्रज्ञांत मतभेद आहेत. एक गट म्हणतो हा थर कमी होतोय, पण छिद्र पडण्याइतक्या वाईट अवस्थेत नाही.
एकूणच क्लोरो-फ्लोरो कार्बनसह इतर हरितगृह वायूंमुळे ओझोनचा थर कमी होत आहे. मानवनिर्मित प्रदूषणाचा मोठा फटका सूर्याच्या अतिनिल किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणा-या ओझोन थराला बसत आहे. याचा अभ्यास नासा या अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्थेने केला आहे. त्यांचे निष्कर्ष धक्कादायक आहेत.
सूर्यापासून अतिनील किरणे येतात ती घातक असतात. त्यांचा सर्वाधिक दुष्परिणाम मानव व वनस्पतींवर होतो. ओझोन वायूचा थर पृथ्वीभोवतीचा संरक्षक थर आहे. हा थर सनस्क्रीनचे काम करतो. ओझोनच्या थराचे संरक्षण केल्याने पृथ्वीच्या वनस्पतींचेही संरक्षण होते आणि लँकेस्टर युनिव्हर्सिटी, नासा आणि इतरांच्या नवीन संशोधनानुसार ओझोनच्या थराने 0.85 अंश सेल्सिअस तापमानवाढ होण्यापासून रोखले आहे.
अंटाक्टिकावर 1985 मध्ये ओझोन थराला मोठे छिद्र पडल्याचे लक्षात आले. हा मानवाने क्लोरो-फ्लोरो कार्बन उत्सर्जित केल्याचा दुष्परिणाम आहे. ओझोन कमी करणारी जी रसायने आणि हरितगृह वायू आहेत ते सामान्यतः रेफि—जरेटर, एअर कंडिशनर आणि हेअरस्प्रेसारख्या एरोसोलमध्ये शीतलीकरणासाठी वापरले जात होते. मात्र त्यानंतर हे वायू कमी प्रमाणात वापरण्याचा जगभर प्रसार झाला. अनेक राष्ट्रांनी त्यावर बंदी आणली आहे.
ओझोन हा ऑक्सिजनच्या तीन अणूंनी बनलेला आहे, त्यामुळे त्याला 'ट्राय ऑक्सिजन' असेही म्हणतात. तो पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फियर या आवरणात असतो. तो मानवासाठी विषारी असला तरीही वातारणात जमिनीपासून 31 मैलांवर असल्याने संरक्षण कवच बनतो. 1960 च्या दशकांत ओझोनवर संशोधन सुरू झाले आणि आता ते एका निर्णायक पातळीवर आहे.
ओझोनच्या थराला छिद्र पडले. या घटनेबाबत शास्त्रज्ञांत मतभेद आहेत. सामान्य माणसाला मात्र याचा काहीही फरक पडलेला नाही. बहुतांश शास्त्रज्ञांच्या मते, ओझोनचा थर कमी झालेला नाही, तर तो आहे, तेव्हढाच आहे. ओझोनबाबत अजूनही मतमतांतरे आहेत.
– श्रीनिवास औंधकर, खगोलशास्त्रज्ञ.
हेही वाचा