

पालघर : पुढारी वृत्तसेवा
पालघर जिल्ह्यातील तलासरी, विक्रमगड आणि मोखाडा या तीन नगरपंचायतींचा निकाल जाहीर झाला. विक्रमगड नगरपंचायतवर निलेश सांबरे यांच्या जिजाऊ प्रणित विक्रमगड विकास आघाडीने 17 पैकी 16 जिंकून निर्विवाद यश प्राप्त केले. 16 पैकी 3 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला एकही उमेदवार निवडून आणता आला नाही.
तलासरी, मोखाडा नगरपंचायतमध्ये कोण सत्ता स्थापन करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. तलासरीमध्ये सीपीएमची सत्ता असून या ठिकाणी भाजपने 6 जागा जिंकून सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले आहे. सीपीएम 6, शिवसेना 3, अपक्ष 2 जागांवर विजयी झाले. त्यामुळे या ठिकाणी भाजप आणि सीपीएमला कुणाची मदत घ्यावी लागते हे पाहावे लागणार आहे. तलासरीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसेला एकही जागा मिळू शकली नाही.
मोखाडा नगरपंचायत राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा यांच्या मतदारसंघातील असून त्या ठिकाणी महाविकास आघाडी, शिवसेना, भाजप आणि जिजाऊ यांनी आपले उमेदवार उभे केले होते. तेथे शिवसेना 8, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडी 5, भाजप 3 आणि जिजाऊ 1 असे बलाबल असून या ठिकाणी कोण कुणाला मदत करतो, याकडे लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीचे 4 आणि काँग्रेसचा 1 उमेदवार निवडून आला आहे.
हेही वाचलं का?