

पुढारी ऑनलाईन डेस्क : दु:खाच्या काळात पंतप्रधान मोदींसोबत आहोत. हिराबेन यांचं आयुष्य संघर्षाचं होतं. असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी कुटुंबीयांचे सांत्वन केले. ते प्रसारमाध्यमांसी बोलत होते. आईचं छत्र जेव्हा निघून जातं तेव्हा माणूस अनाथ होतो. मोदी यांच्या मातोश्रींचं निधन झालं. त्या आजारी होत्या. त्यांना एक समृद्ध आयुष्य लाभलं, असे राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले, देशाचे नेतृत्व करणारे पंतप्रधान झाले. कितीही मोठा उद्योजक, व्यापारी , ताकदवर असो. आईचं छत्र गमावल्यानंतर तो माणूस अनाथ होतो. जनता, ठाकरे परिवार आणि आम्ही संपूर्ण कुटुंबीय त्यांच्या दु:खाच्या कठीण समयी त्यांच्यासोबत आहोत.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी बोलताना राऊत म्हणाले, मराठी माणसांविरोधात अत्याचार सहन करणार नाही. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृतीवर अत्याचार होत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरदेखील हे होत आहे. मुंबईतील कानडी बांधवांबाबत आमची तक्रार नाही. पण, राज्याच्या सीमाभागात मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत. मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करणारे मुर्ख आहेत. कर्नाटकाचे मुख्यमंत्री मिस्टर बोम्मईंनी मराठी बांधवांचं संरक्षण करावं, अशी संजय राऊत यांनी मागणी केली.
राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही ताशेरे ओढले. ते म्हणाले, शिवसेनेच्या माणसांना बोलायला द्यायचं नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काहीतरी खालून खाणाखुणा करतात, इशारे करतात; त्यावर निर्णय घेतला जातो. विधानसभाध्यक्ष पक्षपातीपणा करतात.