श्रीरामपूर-वैजापूर रस्त्याची दैना मिटेना ! | पुढारी

श्रीरामपूर-वैजापूर रस्त्याची दैना मिटेना !

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा :  श्रीरामपूर तालुक्याला मराठवाड्याशी जोडणारा जवळचा श्रीरामपूर – वैजापूर रस्ता खराब झाला आहे. सध्या 30 किलो मीटर अंतरासाठी सव्वा ते दीड तासाचा वेळ लागतो. 20 किलो मीटर प्रति तासापेक्षा जास्त वेगाने कोणतेही वाहन चालवता येत नाही. केवळ लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत केलेल्या दुर्लक्षाचे परिणाम दोन्ही भागातील जनतेला भोगावे लागत आहेत. या रस्त्याच्या कामामध्ये लक्ष घालून मजबुतीकरणासह रस्ता चौपदरी करावा, यासाठी खा. सदाशिव लोखंडे दोन्ही तालुक्यांतील त्रस्त जनतेने खा. सदाशिव लोखंडे यांना साकडे घातले. श्रीरामपूर – वैजापूर रस्त्याचे अंतर 38 कि.मी. आहे. खा. लोखंडे यांनी दिल्ली दरबारी वजन वापरून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून खास निधी उपलब्ध करुन, वर्षानुवर्षे हालापेष्ठा भोगणार्‍या जनतेची सुटका करावी, मागणी यावेळी करण्यात आली.

श्रीरामपूर ते खैरी निमगावपर्यंतचा 8 कि.मी. पर्यंतचा रस्ता चांगला आहे. तेथून पुढे नाऊर पर्यंत रस्ता खूप खराब आहे. या रस्त्यावर 20 पेक्षा जास्त वेगाने गाडी चालवता येत नाही. सिंगल रोड असल्याने प्रवासाला वेळ लागतो. तेथूनपुढे वैजापूर तालुक्यात लाडगाव पासूनपुढे रस्ता चांगला आहे. मधला रस्ता थोडा खराब आहे. सध्या उसाच्या गाड्या चालू असल्याने रस्त्याची परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात जाणारा जवळचा म्हणून हा रस्ता सोयीस्कर आहे, परंतु खैरी निमगाव ते नाऊरपर्यंत रस्ता वाईट अवस्थेत आहे.

लाडगाव, सावखेड गंगा, वांजरगाव येथील जनतेचा श्रीरामपुरशी नियमित संपर्क आहे, मात्र रस्त्याची दुरावस्था असल्याने त्याचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतात. ‘नसून ताप असून संताप’ अशी या रस्त्याची अवस्था झाली आहे. खा. डॉ. सुजय विखे यांनी नगर दक्षिणमध्ये 25 कोटी रुपये रस्त्यांसाठी आणले. खा. लोखंडे यांनीसुद्धा रस्ते विकास निधी आणावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

श्रीरामपूरसह सराला बेटास लाभ !

रस्ता चांगला झाल्यास त्याच्या फायदा श्रीरामपूर बाजारपेठेला होणार आहे. सराला बेटात येणार्‍या भाविकांची मोठी सोय होणार आहे. जिल्ह्यात आजी- माजी मंत्री सराला बेटात नियमित येतात, मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिले नाही.

Back to top button