सर्वसामान्यांच्या कष्टाची भाकरी झाली महाग ! | पुढारी

सर्वसामान्यांच्या कष्टाची भाकरी झाली महाग !

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  चपातीपेक्षा भाकरी महाग झाली आहे. भाकरीचे आयुर्वेदिक महत्व वाढले असून गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात ज्वारीचा धान्य बाजार तेजीत असल्याचे दिसून येत आहे. सध्या ज्वारीचा भाव वधारल्याने सर्वसामान्यांची कष्टाची भाकर महाग झाली आहे.  हॉटेलमध्ये सुद्धा भाकरीची किंमत चपातीपेक्षा जास्त आहे. ज्वारीचा घटता पेरा व आरोग्याला असलेले आयुर्वेदिक लाभ यामुळेच आपसूकच भाकरीकडे अनेक जण वळत आहेत. सध्याच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीत आहाराला अति महत्त्व आले आहे.

आरोग्य बंदिस्त होऊ नये, याकरिता प्रत्येक जण सतर्क राहतो. त्यादृष्टीनेच आहारातील योग्यता पाहता त्याचे सेवन अनेकजण करतात. विशेषतः पोटाचे विकार पचनक्रिया बदलण्यासाठी अनेकांच्या घरात ज्वारी आणि बाजरीची भाकरी जेवणात वापरतात. बाजारात 20 ते 35 रुपयांपर्यंत दराने एक किलो ज्वारीची विक्री होत आहे. तर, गहू 22 ते 28 रुपये किलोप्रमाण धान्य बाजारात भाव आहेत. त्यामुळे गरिबांच्या चुलीवरील भाकर आता श्रीमंतांच्या गॅसवर फिरताना दिसत आहे. झुणका भाकरीचा आस्वाद मोठ्या प्रमाणावर घेतला जात आहे.

दुष्काळ आणि चालू वर्षी अतिवृष्टीमुळे आणि इतर विविध कारणांमुळे ज्वारीचे उत्पादन कमी झाल्याने ग्रामीण भागातही चूलीवर सर्रास चपाती दिसू लागली आहे. गत अनेक वर्षांपासून ज्वारीच्या उत्पादनात घट झाली आहे. अशातच यावर्षी पावसामुळे ज्वारीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे यापुढील काळात गरिबांची भाकर आणखीनच महागणार असल्याचे चित्र आहे.

ज्वारीच्या भाकरीचे आरोग्यदायी फायदे

ज्वारीमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने शरीरास पटकन ऊर्जा मिळते. कमी खाऊनही पोट भरल्याची जाणीव होते. ज्वारीमध्ये असणार्‍या अमिनो अ‍ॅसिड्समधून शरीरास मुबलक प्रोटीन्स मिळतात. तसेच फायबर्स असल्याने सहज पचन होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणार्‍या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाण्याची सवय लावून घ्यावी. त्यामुळे मूळव्याधाचा त्रास होत नाही. तसेच ज्यांना किडनी स्टोनचा त्रास टाळायचा असेल त्यांनी नक्कीच ज्वारीची भाकरी आहारात आणावी.

ज्वारीतील पोषणतत्त्वामुळे किडनी स्टोनला दूर ठेवता येते. ज्वारीमध्ये असणार्‍या निऍसिनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तसेच ज्वारीमधील फायटो केमिकल्समुळे हृद्यरोग टाळता येतात. ज्वारीमधल्या पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि मिनरल्समुळे ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. भाकरीत लोह मोठ्या प्रमाणात असते. ऍनिमियाचा त्रास असणार्‍या व्यक्तींनी ज्वारीची भाकरी खाल्ल्यास त्यांना फायदा होतो. लाल पेशींची वाढ होण्यास मदत होते.

Back to top button