

गंगाखेड (परभणी); पुढारी वृत्तसेवा: परभणी तालुक्यातील खळी या गावी 'ऑक्सिजन पार्क' लोकचळवळीतून उभारला जात आहे.
सरपंच शिवाजी पवार यांच्या संकल्पनेला संपूर्ण ग्रामस्थांसह परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी उर्जा दिल्याने या ठिकाणी 'ऑक्सिजन पार्क' लवकरच उभारला जाणार आहे.
कोरोना महामारीत अनेकांनी ऑक्सिजन अभावी आपले जीव गमावावा लागला. परिणामी, कोरोनामुळे मानवाला ऑक्सिजनचे मूल्य समजले. नेमका हाच विचार मनात ठेवून तालुक्यातील खळी गावचे युवा सरपंच शिवाजी पवार यांनी गावातच पडिक असलेल्या दोन एकर जमिनीवर 'ऑक्सिजन पार्क' उभारण्याचा संकल्प केला.
यातून ग्रामस्थांना आवाहन करत जमेल त्याने श्रमदान, जमेल त्याने या पार्क साठीचे इतर वस्तूरुपी साहित्याचे दान देण्याचे आवाहन केले. संपूर्ण ग्रामस्थांनी या पार्कसाठी भरभरून दान दिले.
या संपूर्ण संकल्पनेस परभणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी स्वखर्चातून सुमारे १ हजार विविध वनस्पतींची वृक्ष ग्रामस्थांना भेट दिली.
एका अधिकाऱ्याने दिलेली भेट ग्रामस्थांना ऊर्जा देणारी ठरली आहे. परिणामी, ग्रामस्थांनी ओमप्रकाश यादव यांना गावात बोलवत वृक्षदिंडी काढून १००० वृक्षांचे वृक्षारोपण केले.
आज परिस्थितीत वृक्षारोपण व ऑक्सिजन पार्कसाठी संपूर्ण गाव श्रमदानासह झटत आहे. परिणामी, आगामी काळात हा 'ऑक्सिजन पार्क' निश्चितच ग्रामस्थांना नवजीवन देणारा पार्क ठरेन अशी चिन्हे आहेत.
ऑक्सिजन प्रत्येक मानवासाठी आज अत्यावश्यक झाले आहे. तसेच प्रत्येक गावाने ही संकल्पना राबवणे अत्यावश्यक असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी सांगितले.
आगामी काळात वृक्षासोबतच बांबूची वृक्ष, फुलांची वृक्ष व फळांचे वृक्ष देऊन ऑक्सिजन पार्क उभारण्याचा मनोदय आहे.
हेही वाचलंत का?