महिला हॉकी संघाच्या पराभवानंतर वंदना कटारियाच्या घराबाहेर फटाके फोडले | पुढारी

महिला हॉकी संघाच्या पराभवानंतर वंदना कटारियाच्या घराबाहेर फटाके फोडले

हरिद्वार; पुढारी ऑनलाईन डेस्क : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत महिला हॉकी संघाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले. पण उपांत्य फेरीत अर्जेटिनाकडून भारतीय महिला हॉकी संघाला पराभव स्वीकारावा लागला.

गेल्या काही वर्षापेक्षा निश्चितच चांगली कामगिरी भारतीय महिलांनी हॉकीत केली. दरम्यान, आज बुधवारी ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने कांस्यपदक मिळवले. त्यामुळे देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

उपांत्य फेरीत भारतीय महिला हॉकी संघाचा पराभव झाला असला तरी संघाची ऑलिम्पिकमधील कामगिरी समाधानकारक राहिली आहे. स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा हा सामना बघत होते. त्यांनी तसे ट्विट करून संघाला शुभेच्छाही दिल्या होत्या.

मात्र, आज एक घृणास्पद प्रकार समोर आला आहे. भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडू वंदना कटारिया हिच्या घरासमोर भारत हरला म्हणून जल्लोष करण्यात आला. काही जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी हे कृत्य केले.

हरिद्वारमधील रोशनबादमध्ये वंदना कटारियाच्या घराबाहेर काही लोकांनी फटाके फोडले. जातीवाचक शिव्या दिल्याचा आरोप वंदनाचा भाऊ शेखर याने एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी बोलताना केला आहे.

आम्ही सामना हरला म्हणून घरी दु:खी होतो सर्वजण, पण लढत चांगली दिली याचं समाधान होतं. सामना संपल्यावर थोड्या वेळाने आमच्या घरासमोर एकदम फटाक्यांचा आवाज झाला, बाहेर जाऊन पाहताच गावातील दोन युवक नाचत होते.

भारतीय संघात दलित खेळाडू असल्याने भारतीय संघाचा पराभव झाला. असे ते म्हणत होते. तसेच सर्व खेळातून दलितांना वगळलं पाहिजे. हे युवक अर्धनग्न अवस्थेत नाचत होते. त्यांनी आमच्या कुटुंबीयांचा अपमान केला. अशी तक्रार वंदनाच्या भावाने केली आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : …या किल्ल्याची तटबंदी सावरणार कोण?

Back to top button