

यवतमाळ ; पुढारी वृत्तसेवा
माहिती अधिकार कायद्याद्वारे माहिती मागविणाऱ्या आरटीआय कार्यकर्त्याचा धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. घाटंजी तालुक्यातील पारवा येथे सोमवारी (दि.१६) ही घटना उघडकीस आली. या प्रकरणात पोलिसांनी ठेकेदारांसह चौघांना अटक केली आहे.
अनिल देवराव ओचावार (३८) याचे परवा येथे झेरॉक्स सेंटर हाेते. ते आरटीआय कार्यकर्ता म्हणूनही काम करीत हाेते. मृत अनिल ओचावार यांनी सन २०१९-२० व २०२०-२१ मधील रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या कामाची माहिती पारवा येथील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मागितली होती. याच कारणावरून त्याचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी रात्री १२.३० च्या सुमारास त्यांना घरून बोलावून नेले आणि खून करण्यात आला. सोमवारी सकाळी तलावाजवळ रस्त्याच्या बाजूला त्यांचा मृतदेह आढळून आला.
अनिल ओचावार याला रात्री १२.३० वाजताच्या सुमारास दानिश शेख इसराईल (२४) याने घरून बोलावून नेले होते. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेहच आढळून आला. अनिल यांच्या गळा, छाती आणि पोटावर धारधार शस्त्राने वार करण्यात आले हाेते. कंत्राटदार विजय नरसिमलू भाषणवार (३८), जावेद मौला काटाटे (३५), दानिश शेख इसराईल (२४) व सुमित शंकर टिप्पणवार (२७, रा. पारवा) यांनी संगनमत करून अनिलचा खून केल्याचे पाेलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी त्याच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीवरून या चाैघा संशयित आराेपींना अटक करण्यात आली आहे. तपास पाेलीस निरीक्षक विनोद चव्हाण करीत आहेत.
हेही वाचलंत का ?