नाशिकच्या माया सोनवणेची महिला आयपीएलसाठी निवड | पुढारी

नाशिकच्या माया सोनवणेची महिला आयपीएलसाठी निवड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकची महिला क्रिकेटपटू माया सोनवणेची महिला टी-20 चॅलेंज 2022 स्पर्धेसाठी निवड झाली आहे. टी-20 चॅलेंज स्पर्धेचे सर्व सामने 23 ते 28 मे या कालावधीत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे, पुणे येथील स्टेडियमवर होणार आहेत. स्पर्धेत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया तसेच भारतातील क्रिकेटपटू सहभागी होतील.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआयतर्फे आयोजित लालभाई स्टेडियम, सुरत येथे नुकत्याच पार पडलेल्या वरिष्ठ महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत अंतिम सामन्यात नाशिकच्या माया सोनवणेने रेल्वेविरुद्ध 2 बळी घेतले. याआधी पुदुचेरी येथे झालेल्या साखळी सामन्यात देखील प्रभावी कामगिरी करताना माया सोनवणेने आंध— व केरळ विरुद्ध 4/4 बळी घेतले होते. अशा प्रकारे आपल्या प्रभावी लेग स्पिन गोलंदाजीने मायाने या वरिष्ठ महिला टी-ट्वेेंटी स्पर्धेत एकूण 11 बळी घेत आपली छाप उमटविली. 2014-15 तसेच 2017-18 च्या हंगामात 23 वर्षाखालील महिलांच्या स्पर्धेमध्ये मायाने भारतामध्ये सर्वाधिक 15 गडी बाद करण्याचा पराक्रम केला होता. पुदुचेरी येथे झालेल्या 23 वर्षाखालील टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेत 2018-19 मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना तिने चांगली कामगिरी केली होती.

मूळची सिन्नरची असलेली माया सोनवणे सिन्नरचे सुनील कानडी यांच्यामुळे क्रिकेटकडे वळली. अगदी सुरुवातीपासूनच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे ज्येष्ठ प्रशिक्षक कै. अविनाश आघारकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रशिक्षक शिवाजी जाधव, सिन्नर यांचेही मार्गदर्शन लाभले. माया उजव्या हाताने सुरेख लेग स्पिन टाकते. तसेच सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन मोक्याच्या वेळी संघाला मदत करीत असते. महिला टी-20 चॅलेंज 2022 या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी माया सोनवणेच्या निवडीबद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा :

Back to top button