दोडामार्ग : हत्तींच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांचे ‘जागर आंदोलन’ | पुढारी

दोडामार्ग : हत्तींच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थांचे ‘जागर आंदोलन’

दोडामार्ग : पुढारी वृत्तसेवा
रानटी हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा. अन्यथा हत्ती बाधित क्षेत्रातील तरुणांना वन विभागातील नोकर भरतीत 10 टक्के आरक्षण देत प्राधान्य द्यावे. या मागणीसह इतर मागणींबाबत केर-भेकुर्ली ग्रामस्थांनी वनविभागाचे लक्ष वेधत केर चव्हाटा मंदिरात रविवारी सायंकाळी ग्रामस्थांनी जागर आंदोलन केले. या आंदोलनात मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शेतकरी सहभागी झाले होते. उपवनसंरक्षक शहाजी नारनवार व वन अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई, शिवसेना तालुका संघटक गोपाळ गवस, सरपंच मिनल देसाई, उपसरपंच महादेव देसाई, पोलिस पाटील तुकाराम देसाई व ग्रामस्थांनी विविध प्रश्‍न करत शहाजी नारनवार यांचे लक्ष वेधले. हत्तींचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची तसेच येथील शेतकरी, ग्रामस्थांना भयमुक्‍त जीवन देण्याची मागणी केली. ग्रामस्थांच्या मागण्या शासनदरबारी पोहोचवल्या जातील, असे आश्‍वासन उपवनसंरक्षक शहाजी नारनवार यांनी देताच आंदोलन रात्री 9.30 वा.च्या सुमारास मागे घेण्यात आले.

तिलारी धरण व परिसरात हत्तींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हत्ती आता मानव वस्तीतही येऊ लागल्याने शेतकर्‍यांचे नुकसान करत आहेत. तसेच मनुष्यहानीची शक्यता निर्माण झाली आहे. या हत्तींचे केर गावात दरवर्षी प्रमाणे यंदाही आगमन झाले असून, ते तेथे वास्तव्याला आहेत. हे हत्ती रात्रीच्या वेळी लोकवस्तीत घुसून नुकसान करत असल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण आहे. तेथील बहुतांश शेती बागायती नष्ट केल्याने शेतकर्‍यांसमोर रोजीरोटीचा प्रश्‍न ठाकला आहे. हत्तींकडून सुरू असलेल्या नुकसानीबाबत वन विभागाला विचारणा केली असता त्यांच्याकडून समर्पक उत्तरे मिळाले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.हत्तींकडून वारंवार शेतीचे नुकसान होत असून, हत्तीबाधित गावातील लोकांना अन्‍नधान्याचा तुटवडा भासत आहे.

Back to top button