Nagpur Crime : खुर्चीला हातपाय बांधून वृद्ध महिलेची हत्‍या | पुढारी

Nagpur Crime : खुर्चीला हातपाय बांधून वृद्ध महिलेची हत्‍या

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा

खुर्चीला हात-पाय बांधून गळा चिरून वृद्ध महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. (७८ वर्षीय) देवकी जीवनदास बोबडे या निवृत्त वैद्यकीय अधिकारी होत्या. नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा वृद्ध महिलेची हत्‍या घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

शनिवार (२७ नोव्हेंबर) रोजी दुपारच्या सुमारास देवकी बोबडे या घरात एकट्या होत्या. त्यावेळी अज्ञात आरोपी त्यांच्या घरात घुसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपींनी आधी देवकी बोबडे यांचे हात पाय खुर्चीला बांधले. त्यानंतर त्यांनी आरडा ओरडा करु नये, या उद्देशाने त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला. अखेर गळा चिरुन त्यांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. शनिवारी रविवारच्या मध्यरात्री हा प्रकार उघडकीस आला आहे. शनिवारी उशीरा रात्रीपर्यंत त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने हा प्रकार उघडकीस आला.

प्राथमिक दृष्ट्या चोरी किंवा लूटमार करण्याच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचं वाटत आहे, मात्र घरातील साहित्य जसंच्या तसं असल्याने शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे वृद्ध महिलेच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

देवकी बोबडे या निवृत्त वैद्यकीय अधिकारी होत्या. नागपूरच्या नंदनवन परिसरात गायत्री कॉन्व्हेंटजवळ असलेल्या घराच्या तळ मजल्यावर त्या पतीसह राहत होत्या. त्यांची मुलगी आणि जावई सुद्धा त्याच घराच्या पहिल्या मजल्यावर राहतात. देवकी यांचे वृद्ध पती जीवनदास बोबडे हे अर्धांगवायूने आजारी आहेत. नागपूर शहरातील नंदनवन भागात शनिवारी दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. वृद्ध महिलेची हत्या नेमकी कोणी केली, त्याचं कारण काय, याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

हे वाचा :

Back to top button