ST staff strike : एसटी कर्मचारी संपाबाबत राज्य सरकार आजपासून कठोर पावलं उचलणार ! | पुढारी

ST staff strike : एसटी कर्मचारी संपाबाबत राज्य सरकार आजपासून कठोर पावलं उचलणार !

मुबई, पुढारी ऑनलाईन

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे, अशा मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना ४१ टक्के पगारवाढ मिळालेली असतानादेखील कर्मचारी संपावर (ST staff strike) आहेत. त्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, “कर्मचारी कामावरू रुजू झाले नाहीत तर रविवारपासून धडक कारवाई सुरू होणार आहे. कारण, शनिवारपासून कामावर रुजू व्हा, नाहीतर कठोर कारवाई करू”, असा इशारादेखील अनिल परबांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिलेला आहे.

अनिल परब यांच्या इशाऱ्यानंतर ६ हजार कर्मचारी शनिवारपासून कामावर रुजू झालेले आहेत. एकीकडे पगारवाढ झालेली आहे तर दुसरीकडे कारवाईची भीती त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी कामावर हजेरी लावलेली आहे. त्यामुळे कामगारांची संख्या १८ हजारांवर गेलेली असून ९३७ बसगाड्या धावलेल्या आहेत. पण, काही ठिकाणी बसेसवर दगडफेक करण्यात आली तर काही ठिकाणी डेपोंबाहेर निदर्शने करण्यात आली आहेत.

पुण्यात एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई

पुण्यात एसटी संपातून (ST staff strike) कर्मचार्‍यांनी माघार न घेतल्यामुळे प्रशासनाने अखेर बडतर्फीचे शस्त्र हाती घेतले आहे. शनिवारी प्रशासनाने एसटीचे पुणे विभागातील ३४ कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. तर २६ कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्यासाठी सेवा समाप्त करण्याची नोटीस दिली आहे.

एसटीचे ३४ कर्मचारी बडतर्फ व ६ कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्यासाठी सेवा समाप्त करण्याची नोटीस दिल्याने कर्मचार्‍यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यातील एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम असले. तरी काही ठिकाणी शासनाने साम, दाम, दंड, भेद यानितीचा वापर करून संपात फूट पाडली आहे. मात्र, अजूनही पुणे विभागातील कर्मचार्‍यांच्या संपाची भिंत मजबूत आहे. ती पाडण्यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करत आहे.

हे वाचलंत का? 

Back to top button